नंदुरबार जिल्हा पोलिसांची स्तुत्य कामगिरी ; सारंगखेड्यातून चोरीस गेलेला महागडा ट्रक एक महिन्यानंतर नाशिक येथून हस्तगत..

Khozmaster
8 Min Read

प्रतिनिधी,प्रविण चव्हाण ; नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलिसांची स्तुत्य कामगिरी.

सारंगखेड्यातून चोरीस गेलेला महागडा ट्रक एक महिन्यानंतर नाशिक येथून हस्तगत करून

एका चोरट्यास घेतले ताब्यात..

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तक्रारदार रऊफ रशिद खाटीक , रा. प्रकाशा ता . शहादा जि . नंदुरबार यांच्या मालकीचा टाटा सिग्मा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे कॅबिन व त्यावर निळया रंगाची बॉडी असलेला 57,00,000 रुपये किंमतीचा 16 चाकी हायवा ( टिपर ) त्याचा क्रमांक एम.एच. 39 ए.डी. 2227 हा दि. 02 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 03.10 वाजेच्या सुमारास सारंगखेडा गावातील श्रीकृष्ण पेट्रोल पंप वरुन कोणी तरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला म्हणुन त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्याला तक्रार दिल्या वरून अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा सारंगखेडा पो.स्टे . गुरनं . १६८/२०२२ भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता .

सदर चा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे व मालमत्तेची किमंत देखील खूप मोठी असल्याने नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन मालमत्ता आरोपीतांचा शोध घेवून त्यांचे वर कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा , नंदुरबार चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले .

पो. निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील यांच्या • नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन तात्काळ गुजरात , मध्यप्रदेश , तेलंगाणा , कर्नाटक , राजस्थान इत्यादी राज्यात रवाना केले .

सदर हायवा मध्ये टाटा कंपनीचे व व्हिलसन कंपनीचे असे दोन जी पी एस सिस्टीम लावण्यात आलेले असतांना सुध्दा अज्ञात आरोपीतांनी सदर 16 चाकी हायवा चोरी केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे त्यांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालकाकडून गाडी मध्ये असलेल्या जी पी एस बाबत माहिती घेतली असता दि . 02 सप्टेंबर रोजी गाडी चोरीस गेलेल्या गाडी बाबत माहीती घेतली असता ती सारंगखेडा- शहादा निझर या मार्गे गुजरात राज्यातील सुरत येथे गेल्याचे समजले . त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जी पी एस चा माग काढत सुरत शहर गाठले . जी . पी . एस . सिस्टीमचा माग काढल्यावर सदरचे जी.पी.एस. हे एका आयशर वाहनाच्या वरील कॅबीनवर आढळून आले . अज्ञात चोरट्यांनी जी . पी . एस . हे शहादा सारंगखेडा या रस्त्या वरून जाणाऱ्या आयशर वाहनावर टाकून तपास पथकाची दिशाभूल केली . त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सारंगखेडा येथून शहादा , शिरपुर , धुळे या मार्गाच्या सर्व ठिकाणांचे उपलब्ध असलेले सर्व सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .

सदर वाहन हे सारंगखेडा येथील श्रीकृष्ण पेट्रोल पंप वरून अनरद बारी येथून वळण घेवून शिरपूर रस्त्याकडे गेल्याचे समजले .

सदर चोरीस गेलेले वाहन हे शिरपूर कडून धुळ्या कडे जातांना दिसले .

त्या वरून तपास पथकाला चोरी गेलेले वाहन हे धुळे शहरात असल्याची किंवा धुळ्याकडून चाळीसगाव कडे गेल्याचे समजले . तपास पथकाने धुळे चाळीसगाव रस्त्या वरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता सदर वाहन हे कन्नड औरंगाबादच्या दिशेने गेल्याचे समजले . औरंगाबाद शहर मोठे असल्याने जालना , सोलापूर , पुणे , मुंबई , नाशिक कडे चोरी गेलेले वाहन जावू शकते . याचा अंदाज घेवून तपास पथकाने प्रचंड मेहनत घेवून सदर वाहन हे औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाविली . त्यानंतर तपास पथकाने आपला मोर्चा नाशिक शहराकडे वळविला . नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील माहिती घेवून ठिक – ठिकाणी पाहणी केली असता चोरीस गेलेल्या वाहना बाबत कोणती ही उपयुक्त माहिती मिळाली नाही .

तपास पथकाकडे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी कोणतीही तांत्रिक मदत शिल्लक नव्हती . त्यानंतर तपास पथकाने नाशिक शहरातील गॅरेज , चोरीचे वाहन घेणारे सराईत गुन्हेगार जूने वाहनाचे स्पेअरपार्ट विकत घेणारे विक्री करणारे तसेच वाहनाचे इंजिन नंबर , चेसिस नंबर यात बदल करणारे यांच्या बाबत माहिती घेण्यास सुरूवात केली . नाशिक शहरात ठाण मांडून 20 ते 25 दिवसांपेक्षा अधिक कालावधी होवून ही चोरी गेलेले वाहन व संशयीत आरोपी यांचा कोणताही शोध लागत नसल्याने तपास पथक निराश झाले होते . तपास पथकास गुप्त बातमीदारांकडून मिळत असलेल्या माहिती वर काम करीत असतांना तपास पथकास नाशिक शहरातील रा. गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा नाशिक शहरातील चारचाकी वाहने चोरणारा कुख्यात गुन्हेगार असून तो आज पावेतो पोलीसांच्या हाती लागला नसल्याची गोपनिय माहिती मिळाली .

गोपनिय बातमीदार स्थानिक पोलीस यांच्याकडे संशयीत गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला याचा कोणताही फोटो , मोबाईल क्रमांक व त्याचे वर्णन नसल्याने त्याचा शोध कसा घ्यावा ? हे मोठे आव्हान पोलीस पथकासमोर होते .

अखेर पोलीस पथकास पाहिजे असलेली माहिती प्राप्त झाली . गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा मूळ पंजाबी असलेला इसम डोक्या वरील तसेच दाढी मिशीचे केस काढून वेषांतर करून त्याचे पंजाब येथील साथीदारांसह नाशिक शहरातील आडगाव परिसरात चोरी गेलेल्या वाहनाच्या विक्री साठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली .

तपास पथकाने आडगाव परिसरात शोधा – शोध सुरु केल्यावर नाशिक- धुळे महामार्गावर डी – मार्ट समोर एक 16 चाकी हायवा ( टिपर ) उभा असलेला तपास पथकास दिसला . तपास पथकाने चोरी केलेले वाहन तेच आहे याची खात्री करून वाहनात बसलेला इसम यास ताब्यात घेवून विचारपूस केली . वाहनातील संशयीत इसमास ताब्यात घेत असतांना चोरी गेलेल्या वाहना जवळून एक इंडिका वाहन वेगाने निघून गेली . वाहनातील संशयीत इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनजित सिंग कशमिर सिंग (वय -35) रा . वॉटर सप्लाय गल्ली , लोकल बस स्थानक जवळ , अमृतसर , जिंदलया गुरु , पंजाब राज्य ह.मु. संत जनार्धन अपार्टमेंट , आडगाव नाका , नाशिक असे सांगितले . तर पोलीस पथक आल्याचे पाहून इंडिका वाहनातून गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ ( बिल्ला ) हरि सिंग राजपुत व बलजित सिंग हा पळून गेल्याचे सांगितले .

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर प्रक्रीया करुन गुन्ह्यातील चोरी गेलेला 57,00,000 लाख रुपये किंमतीचा हायवा ( टिपर ) जप्त केला असून गुन्ह्यातील फरार आरोपी गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ बिल्ला व त्याचा साथीदार बलजितसिंग यांना देखील लवकरच अटक केली जाईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सागितले .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार , मोहन ढमढेरे , विकास कापूरे , पोलीस अमंलदार किरण मोरे , यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली असून पी. आर . पाटील , पोलीस अधीक्षक , नंदुरबार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करुन तपास पथकास बक्षीस जाहीर केले आहे .

 

0 9 4 7 5 8
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *