नागपूर : बहुजन महिला अधिकार परिषदेतील डॉ. सुरेश माने यांचे आवाहन — “महिलांनी फुले-आंबेडकरी चळवळ गतिमान करावी”
नागपूर : “एससी, एसटी, ओबीसी बहुजन महिला आजही राजकीय व सामाजिकदृष्ट्या पुरेशा प्रमाणात जागृत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होतात आणि त्यांना न्याय मिळत नाही. महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी जागृत करून फुले-आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (B.R.S.P) चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.
विदर्भ प्रदेश बी.आर.एस.पी महिला आघाडी तर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे आयोजित बहुजन महिला अधिकार परिषदेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
डॉ. माने म्हणाले, “आगामी काळ देशासाठी कठीण दिसतो आहे. संविधानाची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, तुमच्या अधिकारांवर गदा येत आहे. याचाच एक भाग म्हणून 19 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे ‘संविधान सन्मान संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.”
मुख्य वक्त्या नंदा फुकट यांनी महिलांना आवाहन केले की, “फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची कास धरून आपले अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा.” यवतमाळ जिल्हा बी.आर.एस.पी नेत्या डॉ. सुनंदा वालदे यांनी सांगितले की, मा. कांशीरामजींची चळवळ गतिमान करण्यासाठी डॉ. माने परिश्रम घेत आहेत; त्यांच्या नेतृत्वात महिलांनी महिलांना जागृत करावे.
या परिषदेत माया सोनावणे, खजिस्ता अस्लम खान, परवीन बी यांनीही विचार मांडले. अध्यक्षस्थानी विश्रांती झांबरे होत्या.
कार्यक्रमादरम्यान चळवळ निधी म्हणून डॉ. सुरेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त विदर्भातील कार्यकर्त्यांकडून ₹65,000 निधी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, डी.एस. मेश्राम, सी.टी. बोरकर, सुरेश मोटघरे, शांताराम जळते, डॉ. विनोद रंगारी यांच्या हस्ते देण्यात आला.
संचालन डॉ. पूनम घोनमोडे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. मंगला पाटील यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मी पाझारे यांनी केले.


Users Today : 50