नागपूर
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नागपूर विशेष न्यायालयाने आरोपी जयेश पुजारी उर्फ कंठा उर्फ जोसेफ उर्फ बशीरुद्दीन उर्फ खुशरुद्दीन याला दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बेलगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून नागपूर येथील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून धमकी दिली होती. जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती.
आरोपीने सुरुवातीला १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर पुन्हा १० कोटी रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास गडकरी यांच्या हत्या करण्याची धमकी दिल्याचे तपासात समोर आले होते.
या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी केला होता. न्यायालयात सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
दरम्यान, या निर्णयामुळे सार्वजनिक प्रतिनिधींना धमक्या देणाऱ्यांविरोधात कठोर संदेश गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Users Today : 23