–जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड बुलडाणा, दि. 9 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 52 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. मतदारांची संख्या सिमीत असली तरी मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निवडणुकीसंदर्भात वेळोवेळी होणाऱ्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सांगितले.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन सभागृहात नोडल ऑफीसर यांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, निवडणूक उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. तुम्मोड म्हणाले, पदवीधर मतदारसंघासाठी मतपत्रिकेवर मतदान करण्यात येणार आहे. पसंतीक्रमानुसार हे मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 52 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मतपेट्या, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, मतदान केंद्राच्या ठिकाणी द्यावयाच्या सुविधा आदींबाबत निवडणूक विभागाने लक्ष पुरवावे. मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असल्यामुळे मतपेटी हाताळण्याचे प्रशिक्षण प्रत्येकांना द्यावे. मतदानासाठी आवश्यक असणारे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविणे आणि त्यानंतर या मतपेट्या मतमोजणी केंद्रावर पोहोचविण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची तातडीने मागणी नोंदवावी. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी मदतीची सोय करण्यात यावी. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.