प्रतिनिधी ,प्रा. भरत चव्हाण : नंदुरबार-क्षयरोग व कुष्ठरोग विभाग यांच्या संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरोग शोध मोहिम अभियानाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषद नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमास याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ. अभिजित गोल्हार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित पाटील, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ.शिवाजी राठोड, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.नारायण बावा आदी उपस्थित होते.
क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम १३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली असून दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील जोखमीची लोकसंख्या राहत असलेल्या विविध भागांमधून ह्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास सहकार्य करण्याचे आवाहन श्री.गावडे यांनी यावेळी केले.
या अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात तसेच वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागातील क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी मराठी व स्थानिक बोलीभाषेतून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी निवड केलेल्या भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन घरांमधील प्रत्येक व्यक्तीस क्षयरोग तसेच कुष्ठरोग याविषयी माहिती देण्यात येऊन कुटुंबातील सदस्यांपैकी ज्यांना क्षयरोग अथवा कुष्ठरोगाची लक्षणे आहेत अशा सर्व संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमुने घेऊन त्यांना मोफत एक्सरे साठी नजीकच्या दवाखान्यात संदर्भीत करण्यात येणार आहे. तसेच कुष्ठरोगाचे संशयीत रुग्णांना देखील संदर्भीत करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेमध्ये 1 हजार 362 पथकांद्वारे 3 लाख 54 हजार 505 इतक्या घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार असून त्यामध्ये 17 लाख 72 हजार 527 इतक्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये क्षयरोग व कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून संशयीत क्षयरुणांची मोफत थुंकी, मोफत एक्सरे तपासणी नजीकच्या दवाखान्यात करून निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू करण्यात येऊन निदान झालेल्या क्षयरुणांना उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा 500 रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी शासना मार्फत देण्यात येतात.
यावेळी जिल्हा लेखा व्यवस्थापक धीरज गावित, जिल्हा आशा समन्वयक प्रसाद सोनार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे, राहुल वळवी, समुवेल मावची, गंगाराम वळवी, प्रवीण सानप, रामचंद्र बारी, महेश सोनी तसेच क्षयरोग विभाग तसेच कुष्ठरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 22