तिरोडा, बोदलकसा येथील पंढरपूर टेकडीवर एका युवकाचा मृतदेह दोन दगडांच्या मध्ये वृक्षांच्या फांद्यांनी झाकलेल्या स्थितीत आढळला. ही घटना गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता उघडकीस आली. पवन प्रभू रहांगडाले (वय 28) रा. डोंगरगाव असे मृत युवकाचे नाव असून या युवकाची हत्या झाल्याने तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 302, 201 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सुरेश प्रभू रहांगडाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ पवन हा 3 सप्टेंबर रोजी कोणत्यातरी अनोळखी इसमासोबत मोटारसायकलने निघून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी त्यांना माजी सरपंच दिलीप बिसेन यांनी सांगितले की, बोदलकसा येथील पंढरपूर टेकडीवर एक प्रेत सापडले आहे व ही माहिती त्यांना वन विभागाकडून मिळाली आहे.
ही माहिती मिळाल्याने फिर्यादीने घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यात टेकडीवर दोन मोठ्या दगडाच्या मध्यभागी सेहना (लेंडी) जड्याच्या फांद्यांनी झाकून एक कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून तो फिर्यादीचा लहान भाऊ मृतक पवन प्रभू रहांगडाले असल्याचे समजले. पवनचा खून करून त्याचा मृतदेह दिसू नये या हेतूने मृतदेहावर झाडाच्या फांद्या घालण्यात आल्या.
मृतक पवन रहांगडाले हा सांगली येथे कामाला होता. सुट्टीनिमित्त तो गावाला आला होता. 4 सप्टेंबर रोजी तो परत जाण्याच्या तयारीत होता. मात्र 3 सप्टेंबर रोजी तो मित्रांसोबत फिरायला गेला होता. मात्र तो परत आलाच नाही. त्यामुळे युवकाची हत्या 3 सप्टेंबरच्या दुपारी 3.30 वाजता ते 14 सप्टेंबर 2022 च्या दुपारी 3.30 वाजता दरम्यान घडली, असा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तायडे करीत आहेत. पोलिसांनी आपली तपासचक्रे वेगाने फिरविली असून आतापर्यंत जवळपास 15 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.