३५ अवजारे विकसित करुन शेतीचा उत्पादन खर्च वाचविण्यात यश
अकोला – भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्टार्टअप’या अभियानामुळे नव कल्पनांसह पुढे येणाऱ्या उद्योजकांना बळ मिळत आहे.अकोल्यातील अक्षय दीपकराव कवळे आणि अक्षय रमेश वैराळे या दोघा अभियंता मित्रांच्या नवसंकल्पनांना आयआयटी कानपूर येथे स्टार्टअप २०२२ या स्पर्धेत देशातील उत्कृष्ट २९ संकल्पनांमध्ये निवडण्यात आले. जिल्हा नाविन्यता सोसायटी मार्फतही त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यात आले असून आता ह्या दोघा मित्रांनी ‘उद्योग भरारी’ घेतली आहे.
अकोला शहरालगत शिवणी येथे अक्षय रमेश वैराळे आणि अक्षय दीपकराव कवळे या दोघाही बी.ई. मेकॅनिकल झालेल्या तरुण अभियंत्यांनी ‘ॲग्रोश्युअर प्रॉडक्टस ॲण्ड इनोव्हेशन्स प्रा.लि. अकोला’ या उद्योगाची सुरुवात केली असून स्टार्टअप आणि जिल्हा नाविन्यता परिषद यामुळे त्यांच्या नवसंकल्पनांना पाठबळ मिळाल्याने त्यांनी चांगलीच भरारी घेतली आहे. ‘ॲग्रोश्युअर’ हे शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करते. ही अवजारे ट्रॅक्टर व विडर यांच्या सहाय्याने चालणारी आहेत. अल्पभूधारक शेतकरी ज्यांना महागडे अवजारे व मजूरांची मजूरी देणे परवडत नाही, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही अवजारे विकसित केली आहेत. आतापर्यंत त्यांनी अशी ३५ प्रकारची यंत्रे विकसित केली असून गेल्या दोन वर्षात हे उद्योजक ८०० शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
ह्या यशाच्या भरारीसाठी कारणीभूत ठरली ती आयआयटी कानपूर यांनी भरवलेली स्टार्टअप स्पर्धा. या स्पर्धेत या दोघा तरुणांनी आपली प्रवेशिका पाठवून आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले. त्यात ५०० जणांच्या संकल्पनांमधून २९ सर्वोत्कृष्ट संकल्पनांची निवड झाली, त्यात ‘ॲग्रोश्युअर’ची ही निवड झाली. त्यात त्यांना १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. या अनुदानाचा विनियोग त्यांनी त्यांच्या उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक बाबींची जुळवाजुळव करणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे त्यांनी नवीन यंत्रे खरेदी, संकल्पनांनुसार अवजारे विकसित करणे व मार्केटींग साठी व्यवस्था उभारणी त्यांनी केली. यातून त्यांनी मिनी दालमिल, पावर विडर, कांदा पेरणी यंत्र, बेड मेकर, मल्चिंग यंत्र या अवजारांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे कौशल्य विकास विभागामार्फत स्थापित जिल्हा नाविन्यता परिषदेकडूनही त्यांच्या संकल्पनांना चालना देण्यात आली. त्यातूनही पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातून त्यांनी कृषी विभागाला अवजारे बनवून दिली. ही अवजारे आता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात.
मुळातच कल्पक असलेल्या या युवा उद्योजकांनी आतापर्यंत शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची ३५ अवजारे विकसित केली आहेत. ही अवजारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून परिक्षण केली जातात. यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतावरही ही अवजारे विविध चाचण्यांमधून पार होतात. तेव्हाच ती ग्राहकांपर्यंत म्हणजेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात.
त्यांच्या अवजारांच्या वापरामुळे शेतीत शेतकऱ्यांना करावा लागणारा उत्पादन खर्च कमी होतो. जमिन तयार करणे, पेरणी, निंदणी, खते देणे, विरळणी, फवारणी करणे, कापणी इ. सर्व कामांसाठी लागणारी यंत्रे त्यांनी बनवलेली आहेत. शेतकऱ्यांचे श्रम आणि उत्पादन खर्च कमी करणारी ही अवजारे शेतकऱ्यांमध्ये पसंत केली जात असून त्यांचे निरंतर संशोधन व नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे सुरु आहे. सद्यस्थितीत या दोघा युवा उद्योजकांनी आठ जणांना थेट रोजगार दिला आहे. तर त्यांच्या उत्पादन ते विक्री या साखळीतूनही अनेकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्यात हे उद्योजक यशस्वी ठरले आहेत. स्टार्टअपच्या पाठबळामुळे त्यांनी ही भरारी आणखीन उत्तूंग होणार हे नक्कीच.