रिसोड वाशिम मार्गावरील घटना..दिपक मापारी, रिसोड अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना रिसोड वाशिम रस्त्याच्या मार्गावर घोटा फाट्याजवळ १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली.अमोल प्रकाश मोरे वय ३४ रा.घोटा असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हे शेतीचे काम आटोपून घराकडे जाण्यासाठी रिसोड वाशिम मार्गाने पायी जात होते. यादरम्यान त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन तिथेच पडून राहिले. ही बाब एका सायकल स्वार प्रा. मेघश्याम पत्रे यांच्या निदर्शनात आली आणि त्यांनी तात्काळ १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला याबाबत माहिती दिली. ही बाब घोटा गावातही समजली. अमोलला वाशिम येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबादला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी अमोल त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्री होती. हे दृश्य पाहण्याशिवाय ती कुत्री काही करू शकत नव्हती पण तिने अमोलला तिथेच सोडले नाही तर तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. या घटनेनंतर घोटा गावात शोककळा पसरली आहे तर दुसरीकडे कुत्रीचे दुःख पाहून सर्वांचेच मन हेलावले आहे. कदाचित त्या कुत्रीला जीभ आणि बोलण्याची क्षमता असती तर तिने सर्व किस्सा सांगितला असता, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे..