सतीश मवाळ . मेहकर . येथील जगप्रसिद्ध नृसिंह मंदिरात श्री नरसिंह संस्थानच्या वतीने सध्या पशुंमध्ये थैमान घातलेल्या लम्पी रोगाच्या साथीबाबत शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 23 सप्टेंबर रोज शुक्रवारी रात्री सात वाजता होणाऱ्या या कार्यशाळेत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हरीश ठाकरे यांचे या रोगाबाबत मार्गदर्शन लाभणार आहे. नरसिंह संस्थानचे अध्यक्ष सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राहतील. सध्या लम्पी रोगाच्या साथीने पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. हजारो पशु या साथीच्या विळख्यात सापडले असून या साथीमुळे शेकडो पशु दगावले आहेत. या रोगाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असले तरी साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. या रोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करावी व रोग झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांमध्ये अज्ञान आहे. या रोगाची कारणे, घ्यावयाची काळजी आणि औषध उपाययोजना याबाबत परिसरातील कास्तकारांना सविस्तर माहिती मिळावी या हेतूने नरसिंह संस्थानने या मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत डॉ.ठाकरे, डॉ.पोफळे यांच्यासह तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना प्रश्न विचारून यासंदर्भात शंका समाधान करून घेता येणार आहे. यासाठी या कार्यशाळेत परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नरसिंह संस्थानच्या वतीने विनोद डुरे पाटील तथा विश्वस्तांनी केले आहे.
Users Today : 14