प्रेमसंघर्ष आणि समतेची आस मांडणारी कविता: प्रेम उठाव

Khozmaster
5 Min Read

जीवनात प्रेम भावनेला अनन्य महत्त्व आहे प्रेम भावना ही एक आंतरिक ऊर्जा आहे. कुणासाठी तरी मन झुरणं, कुणीतरी हवंहवंसं वाटणं आणि कुणाच्यातरी हृदयात आपण बंदिस्त होणं, ही प्रेमाची अस्सल कबुली असते. तात्कालिक प्रेम उथळ असतं, मात्र अंतःकरणात प्रेमाला दिलेली जागा खूप बोलकी असते. प्रेमाला उपमा नसते. प्रेम शब्दांत मांडणं कठीणच असतं, मात्र प्रेमाच्या विविध रुपांची – छटांची एक अस्वस्थ घालमेल आणि संवेदनशीलता यातून एक प्रदीर्घ जग व्यक्त होत असते.

कवी नवनाथ रणखांबे यांचा ‘प्रेम उठाव’ हा काव्यसंग्रह या लेखनामागे निमित्त आहे. साधारणतः तारुण्याचा बहर ओसरला की त्या प्रेम भावनेचे एक चिंतन बनते. रणखांबे यांची कविता या चिंतना अगोदरची आहे. तारुण्य – जोश – बहर – प्रेमभावना -हृदयाची देवाण – अबोल्याची धडक – हुंदक्यांचे झालेले गाणे – अशा कितीतरी गोष्टीत हुरळून जाणारी प्रेम भावनेची ताकद आहे. शिवाय बाबासाहेबांच्या विचारसरणीच्या प्रभावातून व्यक्त होणारी आहे. लेखणीवर अगाध श्रद्धा आहे. ज्यामध्ये विचारक्रांती आणि समानधर्मीय बीजे आहेत.

प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्याचा जिव्हाळ्याचा विषय . विविध रंगी नवं आयुष्य जगतांना प्रेमाची झालेली ओळख आणि माणुसकीच्या नात्यातले प्रेमबंध खूप महत्त्वाचे आहे. अबोलपणे बहरणारी प्रीत,अबोला, विरह, दुःख, मिलन, शपथा , अलिंगन या सगळ्यातून व्यक्त होते. एकीकडे प्रेयसी विषयी हळहळ आहे आणि दुसरीकडे अन्यायाविरुद्ध बंडाची भावना आहे. प्रेम आणि मरण, सल आणि दुःख , काळ आणि विक्राळ रूप, समाजव्यवस्थेचे सलणारे प्रश्न लोकांच्या मनातील आरपार भावना या सगळ्यांचे प्रत्यंतर ही कविता वाचतांना होते. कवीची धांदल अवस्था निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या जीवन आकलनाची क्षमता, जगण्यातील उत्कटता आणि काळाबरोबरचे शब्दभावनेसह असणारे जगण्यातले प्रत्यंतर एखाद्या उठावा सारखेच आहे. अशा भावनिक प्रेमाबरोबच वेदना संवेदनांचे जग मांडणारे प्रेमही खूप महत्त्वाचे आहे. ही प्रेम भावना वैयक्तिक आहे, तिथे तिच्याबद्दलच्या आठवणींचा मोठा गुंता आहे, हृदयात साठून राहणारी जागा आहे. प्रेयसीने धोका दिला तरी तिचे हृदयातील स्थान अढळ आहे. सगळ्याच भावना शब्दांत मांडता येत नसल्या तरी प्रेमभावनांचा शब्दखेळ कवी मांडत राहतो.

 

” का हा विरह/

का हा दुरावा /

तुझ्या आठवांचा/

हृदयात ओलावा /”      – ३६

कवी हा ओलावा जपत राहतो. नि:स्वार्थी प्रेम भावनेचे रंग आणि गंध कवीला जाणवतो. प्रेम भावनेचा चिंब पाऊस, मनाची मुक्त शैली , प्रेयसीसाठीचे मुक्त झुरणे, दोन जीवांच्या नात्याची उलघाल , प्रेमातला हळवा भाव , प्रेमानेच जग जिंकण्याची भाषा अशा किती तरी उदा. मधून कवीची व्यापक प्रेम भावना जाणवत राहते. पौंगंडावस्थेतील युवकाची प्रेम भावना आणि त्याचे सामर्थ्य कवीच्या प्रगल्भतेतून व्यक्त होते. मनाची तारुण्यातील झिंग सौंदर्याची मोहकता, प्रियकर प्रेयसी यांच्यातील भावनांची उत्कटता अशा गोष्टीतून प्रेमातील व्यापक सौंदर्य कवी मांडतो .

खरेतर संपूर्ण कवितेची भूमिका पाहता एका बाजूला अशी प्रेमाची अशी हळवी संवेदना आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रेमातले अनेकपदरी रंग आहेत. तिथे केवळ प्रियकर – प्रेयसी हेच प्रेम नाही तर त्यापलिकडचे एक विश्व आहे. तो प्रेमभाव समाजव्यवस्थेचा आहे. आयुष्याच्या रणांगणात लढताना – जगताना जाणवणारी व्यापक विचारधारा लढवय्येपणा सांगणारी आहे. क्रांतीची मशाल, स्वातंत्र्य – समता – बंधुतेचा प्रदीर्घ विचार, भावणेची कोंडी , व्यवस्थेचा प्रश्न, निळ्या निशानाची गाथा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरील श्रद्धा यातून एक जीवनसंघर्षाची व्यापक कहाणी कवी मांडतो. जगणं समृद्ध करायचं तर अस्तित्वभान यायलाच हवं, ही स्वतःची भूमिका कवी मांडतो. केवळ संघर्ष नाही तर जगण्याची आच आहे. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना वर्तमान वास्तवात उत्तरे शोधत त्याची धडपड आहे. जगणं शब्दबद्ध करताना कवितेच्या शब्दाबरोबरच एक जगण्याचा समुद्रच कागदावर उतरतो आहे. या सगळ्याचे अचूक भान कवी व्यक्त करतो. पत्ता , प्रेम, उदासता , लेखणी , अस्वस्थ आशा कितीतरी कविता प्रेम भावानेची आंदोलने मांडतात . मात्र ‘उठाव’ सारखी कविता समतेचे सूत्र मांडते. काळाबरोबर धावताना माणूस म्हणून जगताना विषमतेचे सभोवतालचे वास्तव पाहून कवीची अस्वस्थता व्यक्त होते. अंधार – उजेडाच्या खेळात माणसाचे काय होईल ? हा प्रश्न कवीला जसा सतावतो तसाच तो वाचक मनाला ही भिडतो. अशा सर्वार्थाने

 ” इडा पिडा जाऊ दे आणि समतेचे युग येऊदे ” 

अशी याचना करतो , आणि ते माणुसकीचे सूत्रच ठळक बनते. जगण्यातील संवेदना जगण्याच्या पातळीवर हरवत निघालीय, पण या संवेदनेचे सहिष्णु व्रत जपायलाच हवे, ही सूचकता कवीने केली आहे. आपल्या शब्दकुवतीनुसार कवितेला न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच काव्यात्म मूल्य आणि ग्रंथनिर्मिती याकडेही अधिक व्यापक जाणिवेने पाहायला हवे होते. कवितेतून नेमके सूत्र व्यक्त व्हावे , म्हणजे जे सांगायचे आहे, ते नेमकेपणाने व्यक्त होईल. यापुढची कविता अधिक चांगली यावी, कवितेची बलस्थाने अधिक व्यापक व्हावीत, अशा तूर्तास शुभेच्छा !

प्रेम उठाव :- नवनाथ रणखांबे ( कविता )

प्रकाशक -: शारदा प्रकाशन ठाणे,

प्रथमावृत्ती :- एप्रिल , २०२२,

पृष्ठ – : ६२ , मूल्य :- ९०/- ₹

ग्रंथ समीक्षा :

प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार

मराठी विभाग , यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी, चंदगड, कोल्हापूर 441 552

बोला – : 9423 286479

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *