छत्रपती संभाजीनगर : शहरातील विस्कळित झालेल्या पाणी पुरवठ्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरवासीयांना मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी दसऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.
चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगपुरा येथील शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत खैरे यांनी शहराच्या विविध भागांतील पाणी समस्या समजून घेतल्या. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘शहरात पाण्याची समस्या फार गंभीर झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भारतीय जनता पक्ष, एमआयएम, सनदी अधिकारी आणि मीडिया यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी विरोध केला नसता, तर समांतर जलवाहिनीची योजना दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली असती आणि नागरिकांना मुबलक पाणी मिळाले असते. ती योजना ७९२ कोटींची होती, किंमत वाढली असती, तर जास्तीत जास्त एक हजार कोटींवर ही योजना गेली असती.
‘पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांचा रोष वाढत आहे. तो व्यक्त करण्यासाठी दसऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात येईल,’ असे खैरे यांनी सांगितले. ‘पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. दहा दहा आणि बारा बारा दिवस पाणी पुरवठा होणार नसेल, तर नागरिकांनी काय करावे,’ असा सवाल त्यांनी केला.
Users Today : 47