आझाद मैदानावरील दसरा मेळाव्याला पहाटे निघालेले, दुधाच्या टँकरची धडक अन् शिवसैनिकाचा मृत्यू, चार जण जखमी

Khozmaster
1 Min Read

सांगली : मुंबईत आज दसऱ्यानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा स्वतंत्रपणे पार पडणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी शिवसैनिक मुंबईकडे येण्यासाठी कालपासून निघाले होते. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमधून मुंबईकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या चारचाकीला दुधाच्या टँकरनं मागून धडक दिल्यानं एक जणाचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण उड्डाणपुला नजिक आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दुधाच्या टँकरने मुंबई ला दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांच्या तवेरा गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. टँकरनं दिलेल्या धडकेत तवेरा मधील विवेक सुरेश तेली हा युवक ठार झाला आहे तर तवेरा मधील ४ जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.प्राथमिक माहितीनुसार अपघातानंतर दूध टँकर चालक पळून गेल्याची माहिती आहे. तवेरा गाडी क्रमांक एमएच १० एजी ४३२० ही कवठेमहांकाळ कडून मुंबईला दसरा मेळाव्यासाठी निघाली होती. दूध टँकर क्रमांक एमएच १० झेड ४४८१ हा दूध टँकर मिरज कडे जात होता.पहाटेच्या सुमारास मिरजकडील बाजूला उड्डाण पुलाजवळ टँकरने तवेरा गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली आहे. धडक एवढी जोराची होती की तवेराची मागील बाजू पूर्णपणे आत गेली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *