पुणे : पुण्यामध्ये जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रमाचे येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक केलेलं नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलतो आहे. जे रामाचे भक्त असतात ते सगळ्यांचे असतात. जे रामाचे भक्त नसतात ते कुणाचेच नसतात, असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे.सनातन धर्म रुढीवादी, जातीयवादी असल्याचा अपप्रचार काही लोक करतात. सनातन म्हणजे अनादी आणि अनंत… सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे. तिथे उच्च नीच असा भेदभाव नाही. सर्व ईश्वरांची मुले आहेत. हा भारताचा विचार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
फडणवीस पुढे म्हणाले, ‘ सर्व देश जागा होतोय. भारत जागा झाला तर जग जागं होईल. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर होत आहे. ज्या ठिकाणी राम लल्ला विराजमान होते, त्याच ठिकाणी हे मंदिर होत आहे. ज्याला प्रभू रामचंद्राची कथा ऐकण्याची संधी मिळते, त्याचे जीवन सफल होते.काल पोलीस दलातील अधिकारी आणि आज थेट गृहमंत्रीच धीरेंद्र शास्त्रींपुढे नतमस्तक
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संगाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भीम आर्मी एकता बहुजन संघटनेकडून विरोध दर्शवण्यात आला होता. कार्यक्रमाला राजकीय, उद्योग क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी दिव्य दरबार कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक आले होते. सभा मंडपातील विविध भाविकांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय सांगताना धीरेंद्र शास्त्री पहावयास मिळाले. त्याच दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बोलावून त्याच्या समस्या आणि त्यावर उपाय सांगितले. ते सर्व ऐकून पोलिस अधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात हजेरी लावून त्यांच्यासमोर लीन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता पोलीस दलाचे मुख्य असणारे गृहमंत्रीच जर धीरेंद्र शास्त्री यांच्या चरणी लीन होत असतील तर दाद मागायची कुणाकडे? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.