पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा सत्संग व दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्याला महा. अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी शासन यंत्रणेकडे केली आहे. तसेच बाबा जे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, वक्तव्य, दावे, कृती करत आहे, त्यासंबंधी बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रातील निवडक तज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत, बाबांना २१ लाखांचे बक्षीस दिले जाईल असे आव्हान बाबांना महा. अंनिसने वेळोवेळी दिले आहे. मात्र ते आव्हान बाबा लेखी स्वरूपात स्वीकारत नसल्याचे महा. अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी सांगितले.
सत्संगाच्या ठिकाणी आमने सामने यावे ही बाबांनी काढलेली पळवाट, अंनिसचा पलटवार
पुण्यात सोमवार ते बुधवार या तीन दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाबांनी सोमवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत महा. अंनिसने दिलेल्या आव्हान प्रक्रियेसंबंधी दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्याचे प्रसारमाध्यमातून समजले. “माझ्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू, एकदाच आमने- सामने होऊन जाऊ द्या” असे बाबांनी म्हटले आहे.यासंबंधी बोलताना विशाल विमल म्हणाले की, सोशल मीडियावर बाबांचे जे भक्त हिंसक प्रतिक्रिया देतात. स्वतः बाबा देखील अशास्त्रीय, असंविधानिक, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चितावणीखोर आणि भडकावून वक्तव्य करतात. त्यामुळे आक्षेप, खुलासे, दाव्यांची सिद्धता ही दरबारात, सत्संगाच्या ठिकाणी शांततेत कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करून विशाल विमल म्हणाले की, उलट दरबारात आमने सामने आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वस्तुस्थिती पाहता बाबांच्या दरबारात अथवा सत्संगाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असणारी शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि खुद्द बाबा देखील आमने सामने वक्तव्य आणि दाव्यांची सिद्धता चाचणी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे दरबारात, सत्संगाच्या ठिकाणी आमने सामने यावे असे म्हणणे ही बाबांनी काढलेली पळवाट आहे.महा. अंनिसने आजवर विविध धर्मीय बुवाबाबा आणि अम्मा ताईंच्या अशास्त्रीय दाव्यांचा पर्दापाश केला आहे. अनेक बाबांना आव्हान देऊन त्यांची सिद्धता चाचणी घेऊन त्यांचे दावे खोटे असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करण्याचे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे. आव्हान स्वीकारल्याचे लेखी द्यावे. महा. अंनिस बाबांच्या संबंधी जी भूमिका घेत आहे ती संविधानिक आहे. त्यामुळे शासन व्यवस्थेने या प्रकरणाकडे केवळ बघ्याच्या भूमिकेतून न पाहता, पुढाकार घेऊन नियंत्रित परिस्थितीत दाव्यांची सिद्धता चाचणी आयोजनात सहभाग दर्शवावा. बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रातील निवडक तज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत, असे पुन्हा आम्ही बाबांना आव्हान देत आहोत, असेही विशाल विमल म्हणाले.
Leave a comment