नागपूर : नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसमध्ये आता चार स्लिपर कोच वाढविण्यात आले आहेत. या गाडीला आधी स्लिपरचे ८ कोच होते. मात्र, १५ जूनपासून त्यांची संख्या दोन करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती.या रेल्वेगाडीचे स्लिपर कोच पूर्ववत करण्याचा मुद्दा झेडआरसीसी सदस्य ब्रजभूषण शुक्ला यांनी लावून धरला होता. स्लिपरच्या दोन कोचमध्ये प्रवाशांना आरक्षण मिळत नाही आणि वातानुकूलित कोचमध्ये मात्र अनेक जागा रिक्त राहतात. स्लिपर कोच हीच प्रवाशांची खरी गरज आहे, हे त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. अखेर या रेल्वेगाडीचे ४ स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल शुक्ला यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ८ येथे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी रेल यात्री संघाचे मनीष सोनी, उज्ज्वला जगताप, जयसिंह कछवाहा, अमोल कोल्हे, गुड्डू टाक्कामोरे, गोकुल प्रजापती, जावेद भाई, अमृत बहोरिया, मुख्तार अहमद उपस्थित होते.