म.टा. प्रतिनिधी, नागपूर: खेळता-खेळता अंगणात ठेवलेलं लोखंडी गेट अंगावर पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा जीव गेला आहे, तर तिचा भाऊ जखमी झाला आहे. ही हृदयद्रावक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथील साईप्रसाद सोसायटीत घडली.
यज्ञा शरद भाजीखाये असे मृतक चिमुकलीचे, तर कौस्तुभ (वय ५, दोन्ही रा. गिदमड, ता. हिंगणा) असे जखमीचे नाव आहे. मनोज प्रल्हाद गजभिये यांच्याकडे स्लायडर गेटचे काम सुरू आहे. त्याच्यासाठी नवीन लोखंडी गेट आणण्यात आले. ते भिंतीला टेकून ठेवण्यात आले होते.
दिवाळीनिमित्त यज्ञा, कौस्तुभ हे दोघे आईसह मावशीकडे आले. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यज्ञा व कौस्तुभ अंगणात खेळत होते. खेळता खेळता लोखंडी गेट दोघांच्या अंगावर पडले. कौस्तुभ हा किरकोळ जखमी झाला तर यज्ञाच्या डोक्याला मार लागला. कौस्तुभ रडायला लागला. नातेवाइकांनी धाव घेतली. जखमी यज्ञाला अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.ते ओवाळणे अखेरचे ठरलेगेल्या १५ नोव्हेंबरला भाऊबीज झाली. यज्ञाने कौस्तुभला ओवाळले. मात्र, बहिणीचे हे ओवाळणे अखेरच ठरेल, अशी कल्पनाही कौस्तुभ व नातेवाइकांनी केली नव्हती. खेळता खेळता काळ बनून आलेले गेट अंगावर पडले अन् यज्ञाचा मृत्यू झाला. या घटनेचा नातेवाइकांना जबर धक्का बसला आहे. यज्ञाची आई धाय मोकलून रडत आहेत. चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.