नागपूर : त्रास असह्य होत असल्याने पतीने नातेवाईक व मित्राच्या मदतीने ब्लेडने गळा चिरून पत्नीची हत्या केली. हिंगणा पोलिसांनी समृद्धी महामार्गालगतच्या वडगाव गुजर येथील महिलेच्या खुनाचा उलगडा करून महिलेच्या पतीसह तिघांना अटक केली.
सूत्रधार देवराम हरिश्चंद्र पटले (वय ४७, वर्ष मूळ रा. रावणवाडी, जि. गोंदिया, ह. मु. प्रसाद कॉलनी, बुटीबोरी), त्याचा मामेभाऊ राजू ऊर्फ रामा बालाराम चौधरी (वय ४२, रा. हिंगणा) व मित्र मुनीर अजगर शेख (वय ५१, रा. मरकधोकडा, ता. उमरेड) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. सावित्री देवराम पटले (वय ४२) असे मृतकाचे नाव आहे. देवराम हा श्रमिक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्री या मनोरुग्ण होत्या. देवरामचा १९वर्षीय मुलगा व १७वर्षीय मुलगी गोंदियातील नातेवाइकाकडे राहतात. त्या देवरामला सतत त्रास द्यायच्या. शेजाऱ्यांच्याशीही वाद घालायच्या. त्यामुळे दर महिन्याला देवरामला घर बदलावे लागायचे. सतत होत असलेल्या वादामुळे त्याला घर भाड्याने मिळायलाही त्रास व्हायचा. त्यामुळे तो कंटाळला. त्याने राजू व मुनीरच्या मदतीने सावित्री यांची हत्या करण्याची योजना आखली. १३ नोव्हेंबरला सायंकाळी तो आणि सावित्री मोटारसायकलने वडगाव गुजर येथील एका शेतात आले. त्यांच्या मागे अन्य एका मोटारसायकलने राजू व मुनीर आले. दोघांनी सावित्री यांना पकडले. देवरामने ब्लेडने सावित्री यांचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह अन्य ठिकाणी फेकून तिघेही मोटारसायकलने पसार झाले.१४ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. उपायुक्त अर्चित चांडक, साहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे, निरीक्षक गोकुल महाजन, साहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग जाधव, हेडकॉन्स्टेबल आनंद वानखडे, अजय गिरडकर, अरुण कांबे, कैलाश चव्हाण, धीरज गायकवाड, नागेश दासरवार, अनिल झाडे, अतुल तलमले, कार्तिक हेडाऊ, संजू तायडे यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. आधी देवराम व नंतर दोघांना अटक केली. तिघांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार
घटना १४ नोव्हेंबरला उघडकीस आल्यानंतर देवरामने तीन दिवसांनंतर पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार बुटीबोरी पोलिसांत दिली. यावेळी देवराम हा बुटीबोरीतून गायब झाला होता. त्याचा मोबाइल बंद होता. बुटीबोरीत महिला बेपत्ता असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग जाधव यांना माहिती मिळाली. त्यांनी बेपत्ता महिलेचे छायाचित्र मिळविले. नातेवाइकांचा मोबाइल क्रमांक मिळवला. सावित्री यांच्या मुलांना मृत महिलेचे घटनास्थळावरील छायाचित्र पाठविले. त्यांनी ओळख पटविली. तीन दिवसानंतर बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी देवरामच्या मोबाइलचे लोकेशन काढले असता ते बालाघाट येथे आढळले. पोलिसांनी त्याच्यावर हायटेक पाळत ठेवली. गोंदियाला येताच पोलिसांनी देवरामला अटक केली. सुरुवातीला आपण एकट्यानेच हत्या केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता चुलतभाऊ व मित्र सोबत असल्याचे त्याने मान्य केले.