नागपूर.वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विदर्भ व छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातूनही विद्यार्थी नागपुरात येतात. शहरात खोलीवर राहून ते अभ्यास करतात. अशाच ‘नीट’च्या तयारीसाठी शहरात आलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व सत्येंद्र श्रीवास्तव (१७, ए टू झेड व्हेंचर पी. जी. हॉस्टेल, गोकुळपेठ) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.तो मूळचा मध्य प्रदेशमधील छिंदवाड्यातील प्रियदर्शिनी कॉलनी येथील रहिवासी होता. ‘नीट’च्या तयारीसाठी त्याने नागपुरात कोचिंग क्लासेस लावले होते व तो होस्टेलमध्ये राहायचा. गुरुवारी १२ वाजेच्या अगोदर त्याने त्याच्या खोलीत सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या होस्टेलमधील इतर विद्यार्थ्यांनी आवाज दिला. आतून प्रतिसाद न आल्याने वॉर्डनला माहिती देण्यात आली. खोली उघडल्यावर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला. त्याला मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याने नेमक्या कुठल्या कारणामुळे आत्महत्या केली हे पोलिसांना कळू शकलेले नाही. घटनास्थळावरून सुसाइड नोटदेखील मिळाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा फोन व इतर दस्तावेजांची चाचपणी करून त्याने हे पाऊल का उचलले याची चौकशी सुरू आहे. बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या
शहरात घडलेल्या अन्य एका घटनेत एका सुशिक्षीत बेरोजगाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उज्ज्वलनगर परिसरात २४ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास समोर आली. लक्ष महेश जुगानी (वय २४, रा. उज्ज्वलनगर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे आई-वडील अन्यत्र राहतात. तो नागपुरात बहिणीसोबत राहत असे. त्याची बहीण श्रद्धा महेश जुगानी ही नागपूर विमानतळ येथे नोकरी करते. लक्ष पदवीधर असल्याचे कळते. मात्र, त्याला नोकरी नव्हती. त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताची होती. त्यामुळे त्याने तणावात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
‘नीट’ प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाची नागपूरमध्ये आत्महत्या
Leave a comment