चंद्रावर भारतीय स्थानक, चांद्र पर्यटन, इस्रोकडून २०४७ पर्यंतच्या मोहिमांचा प्लान तयार

Khozmaster
3 Min Read

म. टा. प्रतिनिधी, पुणे: चंद्रावर भारताचे कायमस्वरूपी स्थानक उभे करून देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत (२०४७) चंद्रावरील खनिजे पृथ्वीवर आणण्याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) योजना आहे. मानवी चांद्रमोहिमेसोबत भारतीयांचा अवकाशात कायमस्वरूपी वावर राहावा यासाठी ‘इस्रो’तर्फे येत्या दशकात अत्याधुनिक अवकाशयाने, अवकाश स्थानक आणि उच्च क्षमतेची रॉकेट विकसित करण्यात येणार आहेत.‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ३२व्या विक्रम साराभाई स्मृती व्याख्यानात ‘अमृत काळातील भारतीय अवकाश संशोधनाची योजना’ मांडली. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सुरू असलेल्या इंडियन सोसायटी ऑफ जिओमॅटीक्स आणि इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंग यांच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये सोमनाथ यांनी ही माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार २०४०पर्यंत भारतीय अवकाशवीर चंद्रावर उतरवण्याची योजना ‘इस्रो’ने नुकतीच जाहीर केली होती. सोमनाथ यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार ‘इस्रो’ने त्यापुढील दशकाचीही योजना तयार केली आहे. सोमनाथ म्हणाले, ‘पुढील २५ वर्षांत, म्हणजेच देशाच्या अमृतकाळात तीन पातळ्यांवर भारतीय अवकाश कार्यक्रमाचा विकास करण्यात येणार आहे. ‘चांद्रयान ३’च्या पुढे ‘चांद्रयान ७’ मोहिमेपर्यंत चंद्रावर भारताचे कायमस्वरूपी अवकाश स्थानक निर्माण करण्यात येईल. २०४७पर्यंत चंद्रावरून आपल्यासाठी उपयुक्त खनिजे पृथ्वीवर परत आणणे, चांद्र पर्यटन आणि चंद्रावरून विविध ग्रहांकडे अवकाश मोहिमा पाठवण्याची क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य आहे.’

‘दुसऱ्या पातळीवर गगनयान मोहिमेच्या विस्तारातून २०३५पर्यंत पृथ्वीभोवती फिरणाऱ्या भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती आणि पुढे चंद्रावरील मानवी यानाच्या निर्मितीची योजना आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी तिसऱ्या पातळीवर भारतीय रॉकेटची क्षमता अनेक पटींनी वाढवावी लागेल. त्यासाठी गगनयान मोहिमेतील ‘ह्युमनरेटेड लाँच व्हेइकल मार्क ३’ची (एचएलव्हीएम ३) क्षमता सेमी क्रायोजेनिक इंजिनाच्या साह्याने वाढवून भविष्यातील ‘नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेइकल’ (एनजीएलव्ही) टप्प्याटप्प्याने विकसित केले जाईल,’ असेही सोमनाथ म्हणाले.

अमृतकाळातील ‘इस्रो’ची योजना
– २०२५ : गगनयान मानवी मोहीम .
– २०२६ : ‘चांद्रयान ४’ : चंद्रावरील दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर आणणे.
– २०२८ : ‘चांद्रयान ५’: दीर्घ कालावधीची मोहीम. चंद्रावर रोबो पाठवण्याची योजना.                                        – २०३० : एनजीएलव्ही रॉकेटची निर्मिती.
– २०३२: चांद्रयान ६ : चंद्रावर स्थानक.
– २०३३ : मानवी मोहिमेसाठीचे ‘एनजीएलव्ही एचआर’ रॉकेट.
– २०३५ : भारतीय अवकाश स्थानक.
– २०३७ : ‘चांद्रयान ७’ : चंद्रावर पायाभूत सुविधा आणि ऊर्जा निर्मिती केंद्र.
– २०३७ : मानवी चांद्र मोहिमेसाठीचे ‘एनजीएलव्ही ऑगमेंटेड’ रॉकेट.
– २०४० : चंद्रावर भारतीय मानवी अवकाश मोहीम.
– २०४७ : चंद्रावरील स्रोतांचा व्यावसायिक वापर, चांद्र पर्यटन, अवकाश मोहिमांचे प्रक्षेपण.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *