पाणी टंचाईमुळे चारा छावण्या सुरू करा

Khozmaster
2 Min Read

मोरगाव, ता. १ : बारामती तालुक्यात सध्या विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे पडल्यामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने जिरायती भागात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.

तालुक्यातील पळशी, तरडोली, लोणी भापकर, मुर्टी या गावांमधून चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी बारामती पंचायत समिती व बारामती तहसील कार्यालय यांच्याकडे केली आहे. जिरायती भागामध्ये ९९ टक्के शेतकऱ्यांकडे पशुधन असून,ते जगवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विकतचा चारा आणणे परवडणारे नसले तरी चढत्या भावाचा विकतचा चारा आणण्याची वेळ आली आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी चारा पिकाचे उत्पादन घेतले आहे तर बागायती भागातही चारा पिके यांचे उत्पादन घेऊन जिरायती भागांमध्ये तो विक्री करण्याचे सध्या काम सुरू आहे.
सध्या दुधाला २६ रुपये प्रतिलिटर दर आहे एका गाईकडून सरासरी पशुपालकांना वीस ते बावीस लिटर दुधाचे उत्पादन दर दिवसाला मिळते. मात्र, गाई साठी दिला जाणारा पशुखाद्य व दोन वेळेचा चारा यांचा खर्च काढला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहत नसल्याची परिस्थिती आहे, अशी माहिती तरडोली येथील पशुपालक राजेंद्र वाघ, राजेंद्र गाडे, सतीश गाडे ,संभाजी शिरे राहुल गाडे यांनी दिली.

पावसाअभावी ज्वारीही हातातून गेल्यामुळे हक्काचा चारा शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची परिस्थिती आहे. याशिवाय आहे त्या पाण्यावर मका कडवळ नेपियर मेथी घास अशी थोडीफार प्रमाणामध्ये पिके होती. मात्र पाण्याअभावी ही पिके अडचणीत आली आहेत त्यामुळे सध्या चारा छावण्या मधून चारा उपलब्ध व्हावा ही मागणी पशुपालकांमधून जोर धरत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *