प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी) हिंदू संस्कृतीतील प्रत्येक कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले माता-पिता यांची मनोभावे सेवा करा कुठल्याही तीर्थक्षेत्राची गरज भासणार नाही. प्रत्येक घराचे मांगल्य आई तर प्रतिष्ठा बाप आहे.असे भावपूर्ण उद्गगार वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी काढले.
शहरातील नळवा रस्त्यावरील कल्याणी पार्क परिसरात गिरासे परिवारातर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी पुढे बोलताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज म्हणाले की, अलीकडे मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे लहान बालकांवर संस्काराचा अभाव दिसून येत आहे.
भागवत कथा आणि देवांचे विचार आत्मसात करण्यासाठी बालकांवर संस्कार काळाची गरज आहे. कथा प्रवचना दरम्यान विरंगुळा, आनंद तितकाच महत्त्वाचा ठरतो. असेही अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले. दरम्यान शनिवारी कथेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, आयोजक ठाणसिंग गिरासे, मनकुवर गिरासे, तसेच मोहिनीराज राजपूत, कैलास चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली.
श्रीमद् भागवत कथा निमित्त मंगळवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. भाविकांनी दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत कथा श्रवणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कथा आयोजक श्रीमती रमणबाई हरीसिंग गिरासे,पप्पू गिरासे, मनकुवरबाई गिरासे, चि. विपुल चि. प्रणव गिरासे व परिवाराने केले आहे. कथेची सांगता गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसादाने होईल.