प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी) सहकार भारतीतर्फे संपूर्ण देशातील नागरी सहकारी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून दिल्ली येथे सुरू होत आहे. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन होईल अशी माहिती सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक आणि नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी दिली.
बिना संस्कार नाही उद्धारया ब्रीद वाक्याने कार्यरत असलेल्या सहकार भारती संस्थेतर्फे उद्या शनिवार दि.2 आणि रविवार दि. 3 डिसेंबर रोजी भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, मेला मैदान, कुसा रोड, नवी दिल्ली
येथे प्रारंभ होत आहे.सहकार भारतीतर्फे 28 राज्यातील 650 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कार्य सुरू आहे. देशातील सर्व नागरी सहकारी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी यांचे सुमारे दहा हजार प्रतिनिधी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत.केंद्र शासनाकडे सहकार भारतीतर्फे पतसंस्थांच्या समस्या मांडण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय अधिवेशनाचे संयोजन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी,सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादे, नाशिक विभागीय प्रमुख दिलीप लोहार (शिरपूर) यांनी केले आहे.नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अनेक नागरी पतसंस्थांचे प्रतिनिधी आणि संचालक अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक आणि नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी दिली.
Users Today : 8