पुणे : तापमानातील लक्षणीय चढउतार, बांधकाम क्षेत्र आणि वाहतुकीमुळे वाढलेले प्रदूषण, त्यातच दिवाळीच्या फटाक्यांची पडलेली भर… या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता संपूर्ण नोव्हेंबर महिना ‘वाईट’ अशी नोंदविण्यात आली. एवढेच नव्हे, तर १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी गुणवत्तेचा निर्देशांक ‘अतिवाईट’पर्यंत घसरल्याने परिसरात सायंकाळनंतर सर्वच धुरके पाहायला मिळाले. शहराच्या बहुतांश भागातही वायूप्रदूषणात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली.
पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषणात वाढ झाली असून, अलीकडे हिवाळ्यात तापमानाचा पारा घसरला की हवेची गुणवत्ता समाधानकारकवरून थेट ‘वाईट’ श्रेणीत पोहोचते. यंदा दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता ढासळली. पाऊस पडल्यानंतर ती पुन्हा सुधारली. मात्र, दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे निर्देशांक घसरला. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’च्या ‘सफर’ विभागाने नोंदवलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहेत. शिवाजीनगरसह पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, निगडीतील आकडेवारी नागरिकांना धडकी भरविणारी आहे.
‘नोव्हेंबरपूर्वी चार केंद्रांमध्ये सर्व दिवस हवा प्रदूषित आणि इतर विभाग २९ दिवस प्रदूषित होते. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी किमान तीन आणि कमाल आठ प्रदूषकांना प्रमाण मानले जाते. धुलिकण,सूक्ष्म धुलिकण आणि अतिसूक्ष्म धुलिकण, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, अमोनिया प्रदूषकांचा एकत्रित निर्देशांक काढला जातो,’ अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.रेव्हेन्यू कॉलनीमध्ये सर्वाधिक प्रदूषण
पुण्यात रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक प्रदूषण नोंदवले गेले. त्यापाठोपाठ म्हाडा कॉलनी, आळंदी, भोसरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कात्रजचा समावेश होता. या प्रदूषकांमध्ये अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण अधिक होते. हे धुलिकण आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे चोपणे यांनी सांगितले.
प्रदूषणाची कारणे काय?
– वाहनांची वाढती संख्या, वाहनांचा धूर.
– रस्त्यावरील, वातावरणातील धूळ, कचरा.
– सार्वजनिक ठिकाणी जाळला जाणारा कचरा.
– विकास प्रकल्प, विकास बांधकाम प्रकल्प, स्थानिक उद्योग.
– रस्ते बांधणी, डागडुजीची कामे.