पुणे : कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाउस) यांना जोडणाऱ्या साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाची लांबी वाढवण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी या पुलाचे काम सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक वळविण्याचा निर्णय झाल्यास पुढील आठवड्यात या पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे.
कोरेगाव पार्क ते कॅम्प परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यावर ‘रेल्वे ट्रॅक’ आहेत. या ‘रेल्वे ट्रॅक’वरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी साधू वासवानी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. या पुलाचे आयुर्मान ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. तो नेमका कधी आणि कोणी बांधला, याची कोणतीही अधिकृत माहिती महापालिकेच्या दफ्तरी नाही. तो धोकादायक झाल्याने गेल्या वर्षभरापासून त्यावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी चारपदरी पूल बांधण्यात येणार असून, त्यासाठी ८३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रियाही राबवली आहे. त्यानुसार पुलाचे काम सुरू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला म्हणाले, ‘या पुलाचे काम सुरू करण्यासाठी पुलावरील वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडे तशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे आठवडाभरानंतर या पुलाच्या कामास सुरुवात होईल.’ यंदाच्या अर्थसंकल्पात या पुलासाठी २० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पुढील काळात या पुलासाठी येणारा खर्च देण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब) प्रमाणे ८३ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारण्याचा निर्णयही स्थायी समितीत घेण्यात आला आहे.महापालिकेकडून साधू वासवानी पूल पाडण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असताना पुणे महानगर परिवहन नियोजन समितीच्या (पुम्टा) बैठकीत या पुलाबाबत चर्चा झाली. त्यात या पुलाची लांबी वाढविणे शक्य आहे का, याबाबत चर्चा करण्यात आली. नवीन सर्किट हाउसच्या प्रवेशद्वारासमोर होणारी कोंडी फोडण्यासाठी या पुलाची लांबी वाढली, तर मदत होणार आहे. त्यासाठी पर्णकुटी चौकाकडे ये-जा करणारी वाहतूक शांग्रिला गार्डन चौकातून उड्डाणपुलामार्गे थेट एम्प्रेस गार्डनपर्यंत नेणे, यासाठी चाचपणी करण्याचे या बैठकीत ठरले. महापालिका प्रशासनाकडून त्याबाबतची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी पुलाच्या कामास सुरूवात केली जाणार आहे.
प्रस्तावित पूल
६४० मीटर
एकूण लांबी
१७.१५० मीटर
एकूण रुंदी
६.९० मीटर
पुलाची उंची