ममता’चा पहिला नातू ‘एचआयव्ही निगेटिव्ह

Khozmaster
2 Min Read

कात्रज – गुजर-निंबाळकरवाडीतील ममता फाउंडेशन संस्थेत निराधार व जन्मजात एड्ससारखा गंभीर आजार नशिबी आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. मुलांचे संगोपन करत असताना त्यांचा पुर्णपणे सांभाळ करण्याचे काम फाऊंडेशमार्फत करण्यात येत आहे.

अशात ममता परिवारातील चार मुलींची लग्नही करुन देण्यात आली असून त्यांचा सुखाने संसार सुरु आहे. त्यातीलच एका एचआयव्ही पॉजिटिव्ह जोडप्याच्या पोटी जन्मलेले पहिले बाळ एचआयव्ही निगेटव्ह जन्माला आले आहे. ‘ममता’चा पहिला नातू हा एचआयव्ही मुक्त जन्मल्याची आनंददायी गोष्ट आहे.ममता फाऊंडेशनमध्ये राहत असलेल्या एचआयव्ही पॉजिटिव्ह निराधार मुला-मुलींनी स्वावलंबी बनत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ममता फाउंडेशन या एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेची स्थापना २००७ साली डॉ. अमर भुडुख व डॉ.शिल्पा भुडुख या दांपत्यांने केली.

या संस्थेत ३६ मुले-मुली वास्तव्यास आहेत. स्वतःची कोणतीही चूक नसताना एचआयव्हीसारख्या आजाराला बळी पडलेल्या मुलांना आधार, प्रेम, वैद्यकीय देखभाल कारण्यासाठी ममता परिवाराचे काम गेली १७ वर्ष सुरु आहे.

सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. समाज या मुलांकडे नकारात्मक भावनेने बघत होता. त्या समाजात मुलांना ताठ मानेने जगता येईल असं त्यांना बुडुख दांपत्याने घडवलं आहे. ही मुले आज आपापल्या पायावर उभी आहेत. ममता परिवारातील मुलं व मुली आज वेगवेगळ्या पदावर नोकरी करत आहेत.

शेल पेट्रोलियम कंपनीमध्ये कोणी पर्यवेक्षक तर कोणी तंत्रज्ञ आहे. एकजण तर एका खाजगी कंपनीत कायमही झाला आहे. एका मुलाने चारचाकी गाडी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. दोन मुलींनी फॅशन डिझाईनचा कोर्स केला असून त्यांनी त्यांचे काम सुरु केले आहे. दोन छोटी मुले इंग्लिश मिडीयममध्ये शिक्षण घेत आहेत.

आपल्या या आजाराचा बाऊ न करता त्याच्यावर मात करून समाजात या मुलांनी एक आदर्श घालून दिला आहे. यासाठी समाजातील अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. गंभीर आजार असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड समाजाला प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिक्रिया –

मुलांना मिळणारा सकस व पौस्टिक आहार, वैद्यकीय सेवा, कौटुंबिक वातावरण, आई वडिलांप्रमाणे प्रेम, या सर्व गोष्टीमुळे मुलांचे आरोग्य उत्तम आहे. सरकारकडून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांमुळे ही मुलं सरळ आणि साधे आयुष्य जगत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी देखील तितकीच महत्वाची आहे.

– डॉ. शिल्पा भुडुख, संचालक, ममता फाऊंडेशन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *