चाकण – पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकणला वाहतूक कोंडीचे ग्रहण हे लागले आहे. हे ग्रहण काही सुटत नाही अशी भयानक अवस्था आहे. वाहनांच्या अगदी एक, दोन किलोमीटर रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिक,प्रवाशी,कामगार, विद्यार्थी सारेच संतप्त झाले आहेत.चाकण, ता. खेड येथील वाहतूक कोंडी ही गेल्या अनेक वर्षा पासून सारेच अनुभवत आहेत.बाह्यवळण मार्ग हा गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहे.या वाहतूक कोंडीला राजकारणाची किनार ही लागली आहे.पुणे- नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरूनगर हे काम होणार असे वारंवार सांगितले जाते.परंतु या मार्गाचे काम काही होत नाही अशी अवस्था आहे.2023 साल संपत आले तरी मोशी ते चांडोली, राजगुरूनगर या मार्गाचे काम होत नाही.त्यामुळे नागरिक, उद्योजक,कामगार, विद्यार्थी यामध्ये तीव्र असंतोष आहे. खासदारसाहेब या मार्गाच्या कामाकडे आता तरी बघा अशी विनवणी नागरिक कामगार यांची आहे.खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यापूर्वी दोन वेळेस येऊन गेले. त्यावेळेस काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुणे- नाशिक महामार्ग,चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गाच्या कामाबाबत त्यांना भेटून निवेदने दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यावेळेस आश्वासने दिली परंतु नुसता आश्वासनांचा पाऊस पडत आहे. पुणे -नाशिक महामार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी नागरिकांची आहे.परंतु प्रत्यक्षात कामाला काही सुरुवात होत नाही. यामुळे नागरिक, वाहन चालक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. या वाहतूक कोंडीत अनेक वेळा रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे जीवही जात आहेत असे भयानक वास्तव आहे.