सतिश मवाळ नियोजन बैठकीत ७ समित्यांचे गठन
मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर परिसरात संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांच्या ९४ व्या प्रणव अवतार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ३० जानेवारीला ज्ञानमंदिराच्या सभागृहात झालेल्या नियोजन बैठकीत ७ प्रभार समित्यांचे गठन करण्यात आले.
गुरुपीठाधिश सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या सान्निध्यात ७, ८, ९ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान या महोत्सवात कीर्तने, प्रवचने, गाथा भजन, पालखी मिरवणूक, महाप्रसाद, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांचं व्याख्यान आदि भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. श्री नरसिंह संस्थान व श्वासानंद सेवा मंडळाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन होत असते. मेहकरला संत बाळाभाऊ महाराजांचे जन्मस्थळ आणि गुरुपीठ आहे. महाराजांचा भक्तवर्ग विशाल संख्येत असल्यामुळे या महोत्सवाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. या भाविकांची व्यवस्था व सुविधा व्हावी यादृष्टीने या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येऊन ७ प्रभार समित्या गठीत करण्यात आल्या. यामध्ये भोजन समिती, निवास समिती, स्वच्छता समिती, पालखी समिती, महाप्रसाद समिती, कार्यालय समिती व समन्वय समिती या समित्यांचे गठन करण्यात आले. श्री नरसिंह संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक विश्वस्त डॉ.अभय कोठारी यांनी केले.