Thursday, July 25, 2024

बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण

बीड लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मतदान केंद्रे बळकावून बोगस मतदान केल्याच्या तक्रारींबाबतचा अहवाल तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.

चोकलिंगम यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आणखी काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

बीड मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले होते. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रे बळकावण्यात आली आणि तिथे मनमानी मतदान करवून घेण्यात आले, अशा तक्रारी आहेत. बजरंग सोनवणे यांनी काही गावांची यादी देऊन तेथे असे प्रकार घडल्याचे म्हटले होते. या संबंधीचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेले होते. या व्हिडीओंची तसेच सोनवणेंच्या तक्रारीची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालातील काही मुद्द्यांवर आणखी स्पष्ट माहिती द्या, असे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. बीडमध्ये प्रत्यक्ष मतदानावेळी गडबडी झाल्याच्या तक्रारी आहेत, तशा तक्रारी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून आलेल्या नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले.

आयोगाने मागविलेली स्पष्ट माहिती बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.

या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर बीडमधील काही मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. मतदान केंद्रे बळकावण्याची चौकशी करावी आणि तेथे फेरमतदान घ्यावे, अशी मागणी शरद पवार गटाने आयोगाकडे केली होती.

आयोगाकडे तक्रार नाही
अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. तेथे मतदानानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या गोदामाची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला, असा आरोप लंके यांनी केला आहे. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला, असा दावाही लंके यांनी केला आहे. आयोग या आरोपाची स्वत:हून दखल घेणार का, याबाबत उत्सुकता आहे. याविषयी आयोगाकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही.

बारामतीतील ‘ती’ घटना
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर ईव्हीएम पुण्यात ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तेथील सीसीटीव्ही ४५ मिनिटे बंद होते, असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र, इलेक्ट्रिक कामांसाठी केबल काढण्यात आल्यामुळे तेथील टीव्हीवर डिस्प्ले नव्हता, परंतु सीसीटीव्ही सुरूच होते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang