रोहित पवारांना जयंत पाटलांचा ठेंगा; युवक प्रदेशाध्यक्ष पदावर मेहबूब शेख कायम

Khozmaster
2 Min Read

 पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची नियुक्ती करण्यासाठी आग्रही आमदार रोहित पवार यांचे वर्षभर सुरू असलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विश्वासू असलेले विद्यमान ‘युवक’ प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हेच या पदावर कायम राहिले आहेत. त्यामुळे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा नव्या ‘राष्ट्रवादी’त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धानपदिनानिमित्त नगर येथे आयोजित कार्यक्रमात व्यासपाठीवर जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या होत्या. त्यानंतर या नेत्यांमधील सुप्त संघर्ष जाहीरपणे चव्हाट्यावर आला असून, त्यांचे समर्थकही एकमेकांवर टीकेची झोड उठवित आरोपांच्या फैरी झाडत आहेत. रोहित पवार समर्थकांकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी होत आहे; तर प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पकडण्याइतके सोपे नसल्याचा टोला जयंत पाटील समर्थकांकडून लगावण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बहुतांश आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, संघटनेतील बहुतांश पदाधिकारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेतच राहिले. त्यामुळे विधिमंडळातील पक्षामध्ये फूट पडल्यानंतरही संघटनेला फारसे तडे गेले नाहीत. जयंत पाटील यांच्या समर्थकांची संघटनेतील लक्षणीय संख्या हे त्यामागचे कारण आहे. बहुतांश शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी हे पाटील यांनीच नियुक्त केले असल्याने ते त्यांच्यासमवेत असल्याचे चित्र आहे. त्यापैकी मेहबूब शेख हे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत.

दरम्यान, ‘राष्ट्रवादी’तील फुटीनंतर आमदार पवार यांनी युवकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढली होती. ‘राष्ट्रवादी’ युवकच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली होती. त्याच वेळी ‘राष्ट्रवादी’तील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. रोहित पवार यांच्या नेतृत्वाला जयंत पाटील यांच्या समर्थक नेत्यांकडून वाकुल्या दाखविण्यात आल्याचे प्रकार घडत होते; मात्र, रोहित पाटील या यात्रेत रोहित पवारांसोबत सक्रिय सहभागी होते. त्यामुळे या यात्रेनंतर रोहित पाटील यांना ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या संघटनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. तेव्हापासून पवार आणि पाटील समर्थकांमध्ये सातत्याने सुप्त संघर्ष दिसत आहे. ‘राष्ट्रवादी’च्या अधिवेशनात या संघर्षाला तोंड फुटले असून, त्यावर दोन्हीही नेत्यांनी साधलेले टायमिंग हा राज्यभर चर्चेचा विषय आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच संघटना कोणाची, यावरून सुरू असलेला हा सुप्त संघर्ष शरद पवारांसाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *