आठ दिवसांत विमा, नुकसान भरपाई द्या ; अन्यथा राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू – रविकांत तुपकर
मेहकर, दि.२९ (प्रतिनिधी) – पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून आज २९ जुलै रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली मेहकरात शेतकऱ्यांचा विराट असा आक्रोश मोर्चा निघाला. प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते. आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास राज्य सरकारला हादररुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करतांना दिला, शिवाय या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करु, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १००% पिकविमा मिळावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक तातडीने मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे तात्काळ मिळावे, तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे राज्याचे प्रमुख नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकरात शेतकऱ्यांचा विराट आक्रोश मोर्चा निघाला. प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी आम्ही आजवर विविध आंदोलने केली आहेत परंतू सरकार निगरगठ्ठपणे वागत आहे, त्यामुळे आता आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देत आहेत. सरकार जर शेतकऱ्यांचा विचारच करणार नसेल तर सरकारला जागे करण्यासाठी आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आली आहे, सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही व आठ दिवसांचा आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करावा, अन्यथा राज्य सरकारला हादरुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना केला, शिवाय या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करु, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी या मोर्चाला गजानन अमदाबादकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, डॉ.ऋतुजा चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, गजानन कावरखे, सहदेव लाड यांनी संबोधित केले तर या मोर्चाला नामदेव पंतगे, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक, प्रकाश गीते, गणेश गारोळे, वैभव आखाडे, जुबेर खान, भगवान पालवे, देवेंद्र आखाडे, गजानन चव्हाण, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, प्रफुल्ल देशमुख, श्रीराम चलवाड, शिवाजी मेटांगळे, अरविंद दांदडे, कल्पना टाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मेहकरात भरपावसातही सभा सुरूच…एकही शेतकरी हालला नाही
रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश मोर्चात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान पावसाने हजेरी लावली तरी शेतकऱ्यांनी मैदान सोडले नाही, भरपावसात तुपकरांच्या भाषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.