प्रतापगड – राजस्थानच्या प्रतापगड येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी तिहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ माजली आहे. प्रतापगडच्या ३ कलियुगी मुलांनी कट रचला आणि वडील, सावत्र आईसह ५ वर्षीय बहिणीची हत्या केली.
या तिन्ही मृतदेहांना दगड बांधून ते बंधाऱ्यात फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी २ मुलांना अटक केली असून तिसरा मुलगा परदेशात पळून गेल्याची माहिती आहे.
प्रतापगड जिल्ह्यातील मुंगाना टांडा गावात ही घटना समोर आली आहे. तिहेरी हत्याकांडात मृतकाची २ मुले मनीराम, करणीराम यांना अटक केली. या आरोपींनी पोलीस तपासात गु्न्हा कबूल केला असून त्यांनी सांगितलेल्या माहितीनं पोलिसही हैराण झाले आहेत. आरोपींनी चौकशीत सांगितले की, आमच्या वडिलांनी एका विधवेसोबत ४ वर्षापूर्वी दुसरं लग्न केले होते. त्यामुळे आम्ही तिघं भाऊ नाराज होतो. त्यामुळेच आम्ही वडील सूरजमल लबाना, त्यांची पत्नी लच्छी देवी आणि ५ वर्षीय मुलीची हत्या केली असं त्यांनी पोलिसांना सांगितले.
५० किलोचा दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकला
हत्या केल्यानंतर आरोपींनी वडील, सावत्र आई, बहीण यांचा मृतदेह ५०-५० किलोचा दगड बांधून जवळच्या एका बंधाऱ्यात फेकून दिला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये यासाठी आरोपींनी त्यांना दगड बांधले. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पोलिसांनी हे सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढले.
गावकऱ्यांनी केला पोलिसांना फोन
आरोपींनी मोठ्या शिताफीनं वडील, सावत्र आई आणि सावत्र बहिणीचा खून केला त्यानंतर त्यांचा मृतदेह फेकून दिला. मात्र गावात हे कुटुंब दिसायचे बंद झाले तेव्हा या गोष्टीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा घराच्या आत रक्ताचे डाग सापडले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर आरोपी २ मुलांना अटक केली. त्यांच्या तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.