अमरावती : आमच सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांचे ३ हजार करू. तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असे धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केले.
तर ज्याचे खाल्ले त्याला जागले पाहिजे तर सरकार देत राहते; पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सोमवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. आमदार रवी राणा यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना सरकारला आशीर्वाद द्या. मी तुमचा भाऊ आहे. अगोदर सरकार देत आहे. त्याचे ऋण जाणले पाहिजे. आशीर्वाद दिला नाही तर १५०० रुपये परत घेणार, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. निवडणुकीत समोर कोण ऐरा-गैरा आहे, त्याचा विचार न करता मी तुमचा भाऊ बहिणीसोबत आहे, हाच विचार करा अन् मला आशीर्वाद द्या, असे विधानसुद्धा आमदार राणा यांनी काढले. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना दिलेला पराभवाचा आशीर्वाद नको तर तो विजयाचा आशीर्वाद पाहिजे, असे ते म्हणाले.
सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा नाही. राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा ही रवी राणा करीत आहे. सरकारने बहिणींची माफी मागावी. आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोलले. लाडकी बहीण ही निवडणुकीपुरती योजना असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
-विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, काँग्रेस
मते दिली नाही तर लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये देणार नाही, योजनेचे पैसे हे रवी राणाच्या घरचे पैसे नसून हे शासनाचे पैसे आहे. राणा यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर आलेला आहे. बडनेरा मतदारसंघातील लाडक्या बहिणी राखी पौर्णिमेला बांगड्या पाठवतील.
-पराग गुडघे, महानगरप्रमुख, उद्धवसेना
बहीण-भावाचं नातं हे गमतीचं, आपुलकीचं, प्रेमाचं असले पाहिजे आणि त्या नात्यांबाबत मी बोललो. मात्र, विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्यावर १५०० रुपयांवरून तो तीन हजार रुपये महिना करण्याची मागणीसुद्धा मी करणार आहे. यात कुणीही कुणीही रा राजकारण करण्याची गरज नाही.
-रवी राणा, आमदार
रवी राणा यांनी महिलांना धमकी दिली व अपमान केला. अंगणवाडी सेविकांना मेळाव्याला आल्या नाही तर लाभ मिळणार नाही म्हणून धमकी दिली. तर ही धमकी याच भगिनी रवी राणा यांची उतरल्याशिवाय राहणार नाही. १५०० रुपये त्यांच्या घरचे नाही. रवी राणांनी समस्त महिलांची माफी मागावी.
-तुषार भारतीय, भाजप नेते