नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अराजक निर्माण झालं आहे. आरक्षणासंदर्भातल्या देशव्यापी आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंसाचाराच्या अनेक कथा आता समोर येत आहेत. हिंसाचारात शेख हसीना यांच्या समर्थकांनादेखील लक्ष्य केलं गेलं. तुरीन अफरोज यांच्याशी मूलतत्त्ववाद्यांनी गैरवर्तन केल्याचं स्पष्ट झालं आहे.
बांगलादेशात भडकलेल्या हिंसाचाराच्या अनेक कहाण्या आता समोर येत आहेत. हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. बांगलादेशातल्या हिंसाचाराचा परिणाम अल्पसंख्याकांव्यतिरिक्त शेख हसीना यांच्या समर्थकांवरही झाल्याचं दिसत आहे. या यादीत बांगलादेशातल्या प्रसिद्ध व्यक्ती तुरीन अफरोज यांचं नावदेखील समाविष्ट आहे. 5 ऑगस्ट रोजी तुरीन मूलतत्त्ववाद्यांच्या निशाण्यावर आल्या. काही लोक बळजबरीनं त्यांच्या घरात घुसले होते. त्यानंतर जे घडलं ते ऐकल्यावर तुम्हाला बांगलादेशातल्या दहशतीची कल्पना येईल.
तुरीन अफरोज यांनी बांगलादेशच्या मुख्य आभियोक्ता म्हणून काम केलं आहे. तुरीन अफरोज यांनी 1971चे आरोपी असलेल्या रझाकारांना बॅरिस्टर म्हणून शिक्षा सुनावली होती. तुरीन यांच्या घरात घुसलेले मूलतत्त्ववादी हे अल बद्र आणि जमात-ए-इस्लामी होते. ‘शेख हसीना यांच्या सांगण्यावरून तुम्ही आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अनेक लोकांना खोट्या आरोपात अडकवलं,’ असं हे मूलतत्त्ववादी तुरीन यांना म्हणाले.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, 5 ऑगस्टला जेव्हा बांगलादेशात हिंसाचार सुरू होता, तेव्हा काही लोक अफरोज यांच्या घरात जबरदस्तीनं घुसले. यापैकी बहुतेक जण हे 18 ते 25 वयोगटातले होते. घरात अफरोज त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीसह एकट्या होत्या. दहशतवाद्यांनी अफरोज यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यांनी तुरीन यांचे केस कापले आणि पेन्सिलने अंगावर जखमा केल्या.
तुरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दिवस खूप भीतीदायक होता. तुम्ही हिजाब का परिधान करत नाही, असा प्रश्न मूलतत्त्ववाद्यांनी त्यांना विचारला. या वेळी ते आपल्या मुलीवर बलात्कार तर करणार नाहीत ना , अशी भीती तुरीन यांना सतावत होती. त्या खूप भेदरलेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी मूलतत्त्ववाद्यांच्या हो ला हो म्हणून हिजाब परिधान करण्यास सहमती दर्शवली; पण मूलतत्त्ववादी यावरच थांबले नाहीत. त्यांनी तुरीन यांचे केस कापले आणि त्यांच्या अंगावर पेन्सिल टोचली.
‘मूलतत्त्ववाद्यांनी मला देश सोडून जायची धमकी दिली. तू तुझी आई शेख हसीना यांच्यासोबत का गेली नाहीस, मोदींनी तुला बोलावलं नाही का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. मी म्हणाले, माझे आई-वडील निघून गेले. मी जाणार नाही. मी याच देशात राहणार. हा माझा देश आहे,’ असं तुरीन यांनी सांगितलं. या घटनेनंतर तुरीन दोन दिवस घरातच राहिल्या. त्या घराबाहेर पडल्या नाहीत.