वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ता.02 ( पुणे प्रतिनिधी)

Khozmaster
3 Min Read

वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला असून वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज, राज्य आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित कृतीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा यावर्षी हा बहुमान महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेली शाळा व  गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीला मिळाला असून या शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांची आजपर्यंत ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या कळो निसर्ग  मानवा या कवितेची निवड सहावीच्या  सुगमभारती पुस्तकात  केली आहे. तसेच मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहाचा या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) द्वितीय वर्षीच्या अभ्यासक्रमात पुढील पाच वर्षांसाठी समावेश करण्यात आला आहे.
स्वतः लिहीत असताना त्यांनी  विद्यार्थी व शिक्षकांना लिहिते केले. मनातल्या कविता,शिंपल्यातले मोती आणि परीसस्पर्श अशी विद्यार्थ्यांची तीन पुस्तके संपादित  करीत त्यांनी शाळेत अनेक बालकवी घडवले आहेत. सध्या ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित समग्र शिक्षा अंतर्गत पुस्तक निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांना पुस्तक निर्मितीसाठी मार्गदर्शन करत असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेत बालसाहित्यिक घडविण्याचे त्यांचे ध्येय आहे.
निकाल जाहीर होताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीचे निर्माते दत्तात्रय वारे यांच्या हस्ते बेंडभर यांचा शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सतिश वाबळे, प्रकाश वाबळे, सतिश कोठावळे, पोपट दरंदले, तुषार सिनलकर, हेमराज वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
बेंडभर यांच्या या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापक विजय गोडसे, सणसवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर व बाळकृष्ण कळमकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *