प्रतिनिधी,प्रा. भरत चव्हाण
नंदुरबार दि.2: प्रत्येक लाभार्थ्यांपर्यत प्रथिनयुक्त व पोषण आहाराचे महत्व विषद करुन अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांनी लाभार्थ्यांच्या आहार व पोषणात सुधारणा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हास्तरीय ‘पोषण माह’ सप्ताहाचा समारोप कार्यक्रम लोय आश्रमशाळा येथे संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमांला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, बालकांच्या स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल पद्धत स्वीकारल्यामुळे सदृढ बालके दिसून येत आहेत ही नक्कीच आनंदाची बाब आहे. सोबतच बालके, गर्भवती मातांना प्रथिनयुक्त , पोषक आहाराचे महत्व विषद करुन त्यांच्या आहारात सुधारणा करावी असे त्यांनी सांगितले.
श्री.गावडे म्हणाले की, पोषण माह हा फक्त सप्टेंबर महिन्यापर्यंतच मर्यादित न ठेवता नियमित असे कार्यक्रम आयोजित करुन पोषणाबाबत लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करुन त्यातून लोकचळवळ सुरु करावी.
श्रीमती.करनवाल यांनी ‘पोषण पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे कौतुक करुन पोषण आहाराचे महत्व सर्व घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जनआंदोलन उभे करावे. यावेळी त्यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविकाचे कौतुक करुन त्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगितले.
जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी मनीषा खत्री तसेच सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागामार्फत पोषण माह दिनानिमित्त अंगणवाडी केंद्रस्तर, बीट स्तर व प्रकल्पस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रम ‘पोषण पे चर्चा’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रस्तरावर व प्रकल्पस्तरावर लाभार्थ्यांच्या सहभागातून प्रथिनयुक्त व पोषक पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रकल्पस्तरावरील सर्वोत्कृष्ट पाककृती, सर्वोत्कृष्ट रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून जिल्हास्तरावर प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली. पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदुरबार प्रकल्पाने पटकावला तर द्वितीय व तृतीय क्रमांकावर शहादा व म्हसावद प्रकल्पाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ठ रांगोळी स्पर्धेत नंदुरबार प्रकल्पाने प्रथम क्रमांक तर खुंटामोडी प्रकल्पाने द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक धडगाव प्रकल्पाला मिळाला. यावेळी सदृढ बालक व बालिका स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरावरील सर्वाधिक प्रथिनांनी युक्त व चविष्ट पाककृती बनविणाऱ्या लोय (डोंगरगाव ) येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी यांना ‘पोषण वीर’ या किताबाने गौरविण्यात आले. यावेळी नवापूर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या पोषण फुगडीने पोषण व आहाराविषयी जनजागृती करण्यात आली.
प्रारंभी उपस्थित मान्यवराचे स्वागत लोय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे सादरीकरण करुन केले. तर अंगणवाडी सेविकांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये शिबली नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिकली. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन महिला व बालविकास विभागाने तयार केलेल्या पोषण घटाचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
जिल्हास्तरीय पोषण माह समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा राठोड यांनी केले.यावेळी त्यांनी महिन्याभरात अंगणवाडी केंद्रस्तर, बीटस्तर आणि प्रकल्पस्तरावरील घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगितली. पोषण माह समारोप कार्यक्राचे सुत्रसंचलन अमोल शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी,अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांनी परिश्रम घेतले.
Users Today : 22