मद्यपी चालक भरधाव वेगात आला अन् चाक अंगावर घातलं, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

मुळशी तालुक्यातील ड्रंक अँड ड्राइव्हची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका पिकप चालकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये चार ते पाच वाहनांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. यात एका महिलेचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात अपघातात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या पत्नी असल्याची माहिती आहे.गीतांजली अमराळे, असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून त्या मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी आहेत. श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे हे रस्त्यावर उभे असताना मद्यपी चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. पिकपचे चाक गीतांजली अमराळे यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीकांत अमराळे देखील यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.आशिष पवार असे मद्यधुंद चालकाचे नाव असून स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चांगला चोप दिला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पौड फाटा रस्त्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री अकराच्या सुमारास पौड रस्त्यावरून एक पिकप चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. या मद्यपी चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात एक चार चाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटना घडल्यानंतर मद्यपी चालकाला स्थानिक नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला आहे. त्यानंतर त्याला अलंकार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये काही वेळ गर्दी जमली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *