पालिकेच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अर्थात बिटको रुग्णालयात डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा तिच्याच वॉर्डात एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग करून तिच्यासह तिच्या पतीला देखील मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडल्याचे उजेडात आल्याने बिटको रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडला असून पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित इसमाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आजवर विविध कारणांनी चर्चेत राहिलेली आहे. करोना काळात एका माजी नगरसेविकेच्या पतीने थेट रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला चारचाकी वाहनाची धडक देवून रुग्णालयाचे प्रवेशद्वाराची मोडतोड करून चारचाकी वाहन रुग्णालयात नेले होते. याशिवाय रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टरांना देखील शिवीगाळ करून धमकावले होते. त्यानंतरही महिला डॉक्टरांना मारहाण, धमकवण्याची घटना मध्यंतरी घडली होती. आता मंगळवारी पुन्हा डॉक्टरांसह परिचारिका, वॉर्ड बॉय आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून धमकवण्याचा प्रकार घडल्याने या रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच आता थेट रुग्णालयात दाखल महिला रुग्णाचा विनयभंग करण्यापर्यंत संशयितांची मजल गेल्याने या रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था ढेपाळली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
Users Today : 22