नाशिक :-
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये आज माजी आमदार, माजी महापौरांसह पाच प्रमुख नेत्यांचे पक्षप्रवेश संपन्न झाले. मात्र, या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशास अनुपस्थित राहून अप्रत्यक्ष विरोध दर्शविला होता.
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. यावेळी मंत्री गिरीश महाजन भाजप कार्यालयात दाखल होत असताना काही काळ कार्यालयाबाहेर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महाजन यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी, “मी नाराज नाही,” असे स्पष्ट केले. मात्र, हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. “मी विरोध करण्यापेक्षा माझे मत मांडले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमचे पॅनल तयार होते. आमदार म्हणून जे वाटले ते मी मांडले. कोणालाही वैयक्तिक विरोध नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ४० वर्षांत आपण कधीही स्वतःसाठी जाहीर भूमिका घेतली नाही, पक्षाशी निष्ठावान राहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. “सगळेच नेते व्हायला निघाले तर कार्यकर्ते कोण राहणार,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षप्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वाधिक आमदार व खासदार भाजपचे आहेत. विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला असून भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हा निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या पक्षप्रवेशावर जोरदार टीका केली आहे. “सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. इतर पक्षांतील नेते घेणे म्हणजे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, नाशिकमध्ये यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेतेच आता इतर पक्षांतील लोकांना सोबत घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकूणच, नाशिकमधील भाजप पक्षप्रवेशांमुळे राजकीय वातावरण तापले असून, स्थानिक पातळीवर नाराजी व प्रतिक्रिया उमटत असल्याचे चित्र आहे.
Users Today : 11