चंडिगढ: हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपने महिलांसह तरुणांना आकर्षित करण्यासाठी आपल्या घोषणापत्रात विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांना दर महिन्याला २, १०० रुपयांची आर्थिक मदत, तरुणांना दोन लाख सरकारी नोकऱ्यांची ग्वाही आणि राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांची हमी देण्यात आली आहे.
५ ऑक्टोबरला होत असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने गुरुवारी ‘संकल्प पत्र’ जाहीर केले. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, केंद्रीय मंत्री एम. एल. खट्टर आदी नेते उपस्थित होते.शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी २४ पिके किमान आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे वचनही भाजपने दिले आहे. सध्या हरयाणा सरकार १४ पिकांची खरेदी किमान आधारभूत किमतीत करते.अग्निवीर योजनेवरून विरोधी पक्षांनी रान उठवले असल्याच्या पार्श्वभूमीवर हरयाणातील प्रत्येक अग्निवीराला सरकारी नोकरीची हमी देण्यात आली आहे. तसेच, मध्य प्रदेशच्या लाडली बहा आणि महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनांच्या धर्तीवर सर्व महिलांना ‘लाडो लक्ष्मी योजनें’तर्गत प्रत्येक महिन्याला २,१०० रुपये देण्याचे वचन दिले आहे. ‘हर घर गृहिणी योजनें’तर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर ५०० रुपयांत दिले जाणार आहे. सध्या राज्य सरकारतर्फे राज्यातील दारिद्र्यरेषेखालील आणि अंत्योदय कुटुंबाला ५०० रुपयांत गॅस सिलिंडर दिला जातो.