लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जागावाटपात काँग्रेसने अधिक जागांची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. तसेच काही काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. या सर्व घटना पाहता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, असं म्हटलं जात आहे. यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “केवळ काँग्रेसचाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचाच आत्मविश्वास वाढलेला आहे”. संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आमचा सर्वांचाच आत्मविश्वास वाढला आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत आत्मविश्वास मिळावा यासाठी एकत्र काम करावे लागेल. तिन्ही पक्षांना एकत्र राहावं लागेल आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? आत्मविश्वास वाढला आहे असं कोणाला वाटत असेल तर तो आत्मविश्वास कोणाचा आहे? कशामुळे आहे? कसा आहे? हा अभ्यासाचा विषय आहे. ठाकरे गटाचे खासदार म्हणाले, तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीचं जागावाटप खूप सोपं होतं. कारण तेव्हा फक्त ४८ जागांचा विचार आम्ही करत होतो. परंतु, आता विधानसभा निवडणुकीला आम्हाला २८८ जागांचं वाटप करायचं आहे. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच आमचे लहान मित्रपक्ष देखील आहेत. त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमच्या मित्रपक्षांना देखील महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही त्यात नक्कीच यशस्वी होऊ. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू. कोणाला खुमखुमी असेल की लहान भाऊ, मोठा भाऊ, लाडका भाऊ तर महाराष्ट्रात काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. काँग्रेसला लोकसभेत जागा जास्त मिळाल्या. पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे.