छत्रपती संभाजीनगर : कांद्याचे भाव सतत वाढत असून, मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव किलोमागे ७० ते ८० रुपयांवर गेले आहेत. तसेच लिंबू, लसणाची तेजी कायम आहे आणि पालेभाज्यांचे दर अद्यापही कमी झालेले नाहीत. निम्मा सप्टेंबर उलटला तरी भाज्यांच्या बाबतीत ग्राहकांना फारसा दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कांद्याची आवक कमी होत आहे व दर सतत वाढत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी कांद्याची ६४० क्विंटल आवक झाली होती आणि ५०० रुपये ते २८५० रुपये याप्रमाणे जाधववाडीच्या बाजारात घाऊक विक्री झाली होती. तर, बुधवारी (१८ सप्टेंबर) ५५९ आवक होऊन १००० ते ४२०० रुपये यानुसार घाऊक विक्री झाली. साहजिकच ८१ क्विंटल आवक कमी होऊन ५०० ते १३५० रुपयांची दरवाढ झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, कांद्याच्या किरकोळ भावात किलोमागे २० ते ३० रुपयांपर्यंत दरवाढ होऊन आता कांद्याचे भाव किलोमागे ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याप्रमाणेच लसणाच्या दरांमध्येही सतत वाढ होत आहे. बटाट्याचे दर काही आठवड्यापासून किलोमागे ५० रुपयांवर स्थिर आहेत. सध्या साधा लसूण २५० ग्रॅममागे १२० रुपयांपर्यंत, तर गावरान लसूण १४० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.लिंबातही कमी-जास्त दरवाढ सुरुच आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लिंबाचा भाव २५० ग्रॅममागे ५० रुपयांपुढेच आहे व बुधवारी लिंबाचे भाव ६० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. अलीकडे कमी झालेले टोमॅटोचे भाव पुन्हा वाढले आहेत व आता किलोमागे ७० रुपयांपर्यंत भाव गेला आहे. अजूनही काही फळभाज्यांचे दर चढेच असून, २५० ग्रॅममागे तोंडले ४० रुपये, श्रावण घेवडा ४० रुपये, फुलकोबी ३० रुपये, शेवगा ३० रुपये, दोडके ३० रुपये, गिलके ३० रुपये, चवळी ३० रुपये, गवार ३० रुपये, सिमला मिरची ३० रुपये, चक्री ३० रुपये, पत्ताकोबी २० रुपये, दुधी भोपळा २० रुपये, भेंडी २० रुपये, गाजर २० रुपये, वांगी २० रुपये, कच्चे टोमॅटो २० रुपये, काकडी २० रुपये, कारले २० रुपये या प्रमाणे बुधवारी भाज्यांची किरकोळ विक्री झाली.अजूनही पालेभाज्या महागलेल्याच आहेत आणि मेथी, पालक व कोथिंबीर ३० रुपये जुडीप्रमाणे गेल्या काही आठवड्यांपासून विक्री होत आहे. तर, इतर पालेभाज्या जुडीमागे २० रुपयांनी विक्री होत आहे. पुन्हा पालेभाज्या मागच्या दोन महिन्यांपासून चांगल्या येत नसल्याचेही दिसून येत आहे.