पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वी गाड्यांचा ताफा घेत महाराष्ट्रात दाखल झालेले तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अल्पावधीतच यूटर्न घेतला होता. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. कारण केसीआर यांच्या बीआरएस पक्षाची महाराष्ट्रातील प्रदेश शाखा आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हावरुन बीआरएसचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
बीआरएस नेत्यांची पवारांसोबत बैठक
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे महाराष्ट्रातील पदाधिकारी येत्या सहा ऑक्टोबर रोजी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची काल शरद पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर ही माहिती समोर येत आहे.
लोकसभेपूर्वीच गुंंडाळलेला गाशा
लोकसभा निवडणुकांपूर्वी खुद्द तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गाड्यांचा ताफा आणत महाराष्ट्रात भव्य प्रवेश केला होता. नागपुरातील शाखेचं केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर विविध पक्षांतील नाराजांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला होता. लोकसभा निवडणुकीत या पक्षभरतीचा मोठा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु त्याच्या उलट घडलं. केसीआर यांनी लोकसभेपूर्वीच गाशा गुंडाळला.
मराठवाड्यात ताकद वाढण्याची चिन्हं
आता विधानसभेच्या तोंडावर बीआरएसची महाराष्ट्र शाखाही राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटात विलीन होण्याच्या मार्गावर आहे. यानंतर महाविकास आघाडीचं बळ वाढण्याची चिन्हं आहेत. मराठवाडा भागात बीआरएसची ताकद पाहायला मिळू शकते. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी महायुतीला धक्का बसू शकतो.
बीआरएस नेते तुतारीवर लढणार?
विधानसभा निवडणुकीत पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हावरुन बीआरएसचे काही नेते, पदाधिकारी रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उर्वरित भागात बीआरएसचं बळ मिळून पवार गटाची ताकद वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात बीआरएसलाही सामावून घ्यावे लागणार आहे.