बुलडाणा : सत्तेच्या नावाखाली शहर, ग्रामीण भागात गुंडशाही फोफावली आहे. धाक, धमकीच्या बळावर मनमानी सुरु आहे. शांतताप्रिय नागरिक या प्रकाराला कंटाळले असून मतपेटीतून आपला राग व्यक्त करतील. सुज्ञ मतदार पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्याचा संदेश दिला. जयश्रीताई म्हणाल्या, यावर्षीची निवडणूक परिवर्तनाची ठरणार आहे. एकीकडे विरोधकांची गुंडशाही आणि मनी, मसल पॉवर तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुसंस्कृतपणा व जनकल्याणाचा विचार आहे. येणारा काळ गंभीर संकट घेऊन येणारा असणार आहे. या संकटांशी दोन हात करण्यासाठी आपणास एकीची वज्रमुठ आवळावी लागणार आहे. माझ्या एकटीचे हे काम नसून आपली खंबीर साथ मला हवी आहे.
बुलडाण्यात विकासाच्या नावाखाली स्वतःची वाहवा केली जात आहे. प्रत्यक्षात कुठलाच विकास झालेला नाही. शाश्वत विकास नाही, एमआयडीसी नाही, रोजगार नाही, सिंचन सुविधा नाही, शैक्षणिक, आरोग्य सोयी अपुऱ्या आहेत. मग कोणता विकास झाला.? कोटींचा निधी आणल्याच्या गप्पा करण्यात येत आहेत. निधी कोणत्या विभागाने दिला अन श्रेय कोण घेत आहे, याची सुज्ञ नागरिकांना कल्पना आहे. कुठल्याच भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. यावेळी परिवर्तन अटळ आहे असा दावा जयश्रीताई शेळके यांनी केला.
Users Today : 82