रविकांत तुपकर हे गोंडस,गुबगुबीत आणी गुलाबी शेतकरी नेते (यामध्ये काहीही व्यंग नसून त्यांच्या चेहऱ्यावर असलेली काश्मिरसारखी लाली प्रत्येक शेतकऱ्याच्या मुखावर दिसावी यासाठी मी आणी तेसुद्धा नक्कीच प्रार्थना करू. ),काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने सिंदखेडराजा येथे उपोषणाला बसलेले होते. त्या उपोषणाची सांगता झाल्यानंतर तिकिटासाठी मातोश्रीवर गेलेले तुपकर एकदम अज्ञातवासात का गेले?विधानसभा निवडणुकीमध्ये “शेतकरी” हा मुद्दा घेऊन तूपकर चुप का बसले? विस पंचवीस ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा करणारे तुपकर यांनी स्वतः सकट सगळ्या समर्थकांना अर्ज मागे घ्यायला का लावले? हे सगळे प्रश्न चटणी भाकर खाऊन, गळ्यातले मंगळसूत्र विकून आणी पोरांना जिल्हा परिषद शाळेला पाठवून तुपकर यांचेसाठी लोकसभा लढायला देणगी देणाऱ्या तमाम जनतेला पडले आहेत.
‘सीजन प्रमाणे’ वेगवेगळे आंदोलने करून सतत चर्चेत राहण्याचा रविकांत तुपकर यांचा नेहमीच प्रयत्न असतो.आणि तसे ते राहतात ही,पण त्यांना हे जमण्यात खूप मोठा वाटा ते आपली प्रत्येक कृती जनतेच्या भावनेशी जोडतात आणी मुळात भावनिक असलेल्या आपल्या समाजाला एवढं ‘भावनिक आवाहन’ वैगेरे करतात की जनतेला तो प्रश्न आपल्याशी, आपल्या अस्तित्वाशी संबंधित वाटायला लागतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘फेसबुक वर केलेल्या पोस्ट’ सरळ, सरळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाहीत तर त्यातही ते ‘त्यांनी केलेले आंदोलन आणि त्या आंदोलनात जनतेसाठी त्यांनी किती ‘त्याग’ केलाय हे मुलाला सांगण्याचा प्रयत्न करतात,की जनतेला ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो?. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या बरोब्बर शेवटच्या दिवशी आपल्या ‘आई-वडिलांना’ स्टेजवर आणून मतदारांना भावनिक आवाहन करणे हाही त्याचा एक प्रकार, किंवा आता उपोषणाला बसल्यावर “शहीद” वगैरे स्वतःला म्हणून घेणे, “सरकारला घ्यायचा असेल तर माझा जीव घ्यावा” असे आवाहन वगैरे करणे, ही सर्व त्यांच्या भावनिक आवाहनाची उदाहरणे आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या आवेशपूर्ण भाषणांनी, यावेळेस खासदार व्हायचेच या एकाच ध्येयाने झपाटलेले तुपकर यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्हा आपल्या भावनिक भाषणांनी एवढा रंगात आणला की, “प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील सगळी मते त्यांनी खाऊन टाकली” आणी नरेंद्र खेडेकर यांना सत्तेच्या विरोधात असलेल्या लाटेचा फायदा न मिळता ते पराभूत झाले.हाच राजकीय निष्कर्ष जवळपास सर्व जेष्ठ राजकीय विश्लेषकांनी काढलाय.तर बऱ्याच जणांना तुपकर यांना खासदार प्रतापराव जाधव यांनीच आपल्या विरोधात लुटूपुटू लढाई खेळायला व मते खायला उभे केले होते असे वाटत आहे.
अगदी हाच फंडा पुन्हा मेहकर विधानसभा मतदारसंघात रविकांत यांनी वापरला व सिद्धार्थ खरात हे निवडून येऊ नयेत म्हणून आ. संजय रायमुळकर यांच्या विरोधातील मते खाण्यासाठी ऋतुजा चव्हाण यांना पाठिंबा देण्यात आल्याची चर्चा होती.पण या निवडणुकीमध्ये रविकांत यांच्याबद्दल एवढी प्रचंड निराशा दिसून आली की वंचित व तूपकर दोघांमिळून फक्त 2200 मते ऋतुजा चव्हाण यांना मिळाली.हा पराभव ऋतुजा चव्हाण यांचा नसून रविकांत तुपकर यांनाच मेहकर मधील शेतकऱ्यांनी जागा दाखवली अशीच चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत होती.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याभोवती जमा असलेली सर्व गर्दी खासदार प्रतापराव जाधव हे मंत्रीपदी पोहोचताच आपोआप विखरून गेली,नेत्याला “गर्दी” आणी “माईक” हवा असतो आणी गर्दी दिसली नाही की नेते कासावीस होतात.
सिंदखेडराजा येथे आंदोलनामध्ये “शहीद” वगैरेच्या गप्पा मारून झाल्यावर ‘मीटिंगच्या फालतू आश्वासनाने’ या उपोषणाची सांगता झाली.मीटिंग ही माजी “साहेबांच्या” त्यावेळी असलेल्या नेत्यासोबतच ठरली, नेत्यांनी थातूरमातूर आश्वासन दिले आणि आता पुढची रणनीती ठरवायचे ठरलं.पण रणनीती ठरलीच नाही.
शेतकऱ्यांच्या भावनांची खेळून त्यांचे समर्थन मिळवून स्वतःचे तुंबडी भरण्याचा हा प्रकार तर नाही ना?
रविकांत तुपकर यांनीही आपल्या भोवती काही “अंध समर्थक” तयार करून ठेवलेले आहेत,त्यामध्ये काहीही दोष नसतांना नुकसान मात्र विनायक सरनाईक व राजपूत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे होत आहे.या दोघांनी चिखली विधानसभा मतदार संघात भरलेले निवडणूक अर्ज मागे का घेतले? या प्रश्नामुळे त्यांच्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेली सहानुभूती कमी होऊन त्यांच्यावरही संशय निर्माण होत आहे.
रविकांत तुपकर यांच्या उपोषणादरम्यान काही जणांनी त्यांची जी प्रत्यक्षाहून अधिक मोठी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी ज्या बातम्या पेरल्या गेल्या, त्या वाचून त्या लिहिणारे, उपोषणाची सांगता ज्या प्रकारे झाली ते पाहून डोक्याला हात लावून बसले असतील.
आता पुन्हा आंदोलनाचा सिजन येईल,किंवा कोणत्या निवडणुका नसल्याने दोन तीन वर्ष आंदोलने होणार देखील नाहीत पण व्यक्ती पूजा मान्य झालेल्या या समाजात, पुन्हा व्यक्ती पूजेच्या नादी लागून सामान्य लोक आपला वेळ, आपला पैसा आणि आपली पिढी कशी वाया घालवत आहेत?आणि त्यांच्या भावनांशी खेळून आपले नेते कम व्यापारी कम राजकारणी पैशाने,प्रसिद्धीने,आणी ताकदीने अधिक अधिक मोठे कसे होत आहेत?हे निरपेक्ष भावनेने पाहण्याची वेळ आली आहे.
Users Today : 13