बुलडाणा : – ( शाहिद शहा )
बुलडाणा जिल्ह्यातील उर्वरित बुलडाणा, मोताळा आणि चिखली तालुक्यांना सुध्दा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना (उबाठा) नेत्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी आज 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा महसूल प्रशासनाकडून नुकतीच १४२० गावांची अंतिम आणेवारी जाहिर करण्यात आली. जिल्ह्याची खरिप हंगामातील परिस्थिती दुष्काळसदृश असून यामध्ये १० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु बुलढाणा, मोताळा आणि चिखली तालुक्यांची आणेवारी ५० पैशांच्यावर आल्याने या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात खरिप हंगामात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात तर काही भागात ऑक्टोबर महिन्यातसुध्दा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. भावफरकाच्या मदतीपासूनही अनेक शेतकरी आजतयागत वंचित आहेत. कित्येक शेतकऱ्यांना अजूनही पिकविम्याची रक्कम मिळालेली नाही. खरिप हंगामात मोताळा तालुक्यातील कपाशीचे लाल्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलढाणा आणि चिखली तालुक्यात सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले तसेच पिकांना योग्य बाजारभाव मिळाला नाही. अशातच जिल्हा महसूल विभागाने जाहिर केलेल्या आणेवारीत बुलढाणा, चिखली आणि मोताळा तालुक्याची आणेवारी ५० पैशाच्यावर दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे प्रशासनाने बुलढाणा, मोताळा आणि चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. तसेच या तिन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना (उबाठा) नेत्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Users Today : 17