येथून जवळच असलेल्या बोरगाव काकडे येथील समाधान अच्युतराव काकडे यांनी त्यांच्या शेतामध्ये जलपूर्ती योजने अंतर्गत विहिरीचा लाभ घेतला होता परंतु आज रोजी त्यांचे शेतातली विहीर चोरीला गेल्याचे निवेदन देत आंबेडकरवादी संघर्ष पार्टीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती अशी की, चिखली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरगाव काकडे येथील शेतकरी समाधान अच्युतराव काकडे यांनी त्यांच्या गट नं. २३६ मधील शेतामध्ये विशेष घटक जलपूर्ती योजने अंतर्गत शासनाकडून विहिरीचा लाभघेतला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आलेले नाही. विहीर केवळ कागदोपत्री पुर्ण झाल्याचे दाखवून शासनाचा निधी लाटल्याचा आरोप करत आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचे विदर्भ प्रदेश कार्यध्यक्ष अनंतराव श्यामरावजी घेवंदे तसेच कृष्णा शेनफड काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करत दि. ६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे सदरहू आमरण उपोषण हे चक्क गट नं. २३६ मध्येच करण्यात येत असून चोरीस गेलेल्या विहीरीचा तपास करुन संबंधित लाभधारक व अधिकाऱ्यांवर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Users Today : 27