मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला आणखी एक दणका देत, त्यांच्या ज्या आमदारांच्या जीवाला धोका नाही, त्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार कमालीचे नाराज झाले असून, त्यांनी ही नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली असून, मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू, अशी वेळ शिंदे यांनी मारून नेली आहे. नव्या नियमानुसार, शिंदे गटाच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या आधी सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एका रक्षकासह फिरावे लागणार असल्याने गृहखात्याच्या या निर्णयावर नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही, त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वाय प्लस सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. तर काही आमदारांची सुरक्षाच काढून घेण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्यात आली आहे.या सुरक्षा कपातीचा सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना. या आधी शिंदेच्या आमदारंना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. त्यामध्ये या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस सुरक्षा तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिस गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलिसही कमी करण्यात येणार आहेत.
Users Today : 35