मलकापूर 🙁 तालुका प्रतिनिधी )
स्थानिक लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत रंगीत तालीम आयोजित करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना आपत्तीवेळी घ्यावयाच्या सुरक्षितता उपाययोजना आणि तातडीच्या प्रतिसादाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रात नगरातील रचना गॅस अँड अँप्लायन्सेस यांच्या वतीने कुणाल येवतकर आणि सचिन गायकवाड यांनी गॅस सिलेंडरमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य अपघातांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच स्वयंपाकघरातील सुरक्षितता आणि आवश्यक दक्षता उपाययोजना याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरजवळ आग लागल्यास ती प्लास्टिक बकेटच्या सहाय्याने कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः प्रत्यक्ष आग विझवण्याचा सराव केला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य निर्णय घेण्याची समज निर्माण झाली. यासोबतच, सिलेंडरला लागलेली आग अग्निशामकच्या सहाय्याने कशी विझवावी याचीही रंगीत तालीम घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आग लागल्यास घ्यावयाच्या तातडीच्या कृती, आग नियंत्रणाचे तंत्र आणि योग्य बचाव प्रक्रिया याबाबत सखोल माहिती मिळाली. यावेळी प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी कुणाल येवतकर आणि सचिन गायकवाड यांचा सत्कार केला. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले आणि भविष्यात अशा प्रसंगांना धैर्याने व योग्य पद्धतीने सामोरे जाण्याची क्षमता विकसित झाली.
Users Today : 64