सिंदखेड राजा 🙁 तालुका प्रतिनिधी )
शासनाने शंभर दिवसांचा अॅक्शन प्लॅन हाती घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थदिन साजरा करण्यात आला. महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पंचायत समितीचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच ठाणेदारांनी तालुक्यातील गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. काही ठिकाणी त्यांच्या समस्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा करण्यात आला. अधिकारी गावात आल्याने अनेक नागरिकांच्या समस्या सुटल्या. काही अडचणी असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. तातडीने समस्या निकाली निघत असल्याने ग्रामस्थदिनाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामस्थदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना करून प्रत्येक बुधवारी तुम्ही गावात जा, तेथील लोकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यावर तत्काळ उपाय करा, समस्यांचा ऑन द स्पॉट निपटारा करा, असे निर्देश दिले. प्रत्येक कामासाठी वेळ आणि पैसा खर्च करून कार्यालयात छोट्याशा कामासाठी येण्याची गरज पडणार नाही, असे एसडीओंनी लक्षात आणून दिले. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी स्वतः साखरखेर्डा परिसरात जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना अॅग्री स्टॅकसह शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर शेतरस्त्याच्या प्रकरणाचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा करून शेतरस्ता खुला करून दिला. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना ऑनलाइन पैसे जमा करून देत त्याचे प्रमाणपत्र वाटप दिन केले. तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली. अनाथ मुलांना मदत करण्याचेदेखील सांगण्यात आले.
महसूल नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांनी सोयंदेव, रुह्मणा, देवखेड येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या ठिकाणी शेतरस्त्याचे प्रकरण निकाली काढले. निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी माळसावरगाव येथील जनसमस्या ऐकून घेतल्या .
Users Today : 64