सिंचनासाठी पाणी द्या म्हणत शेतकऱ्यांसाठी कैलास नागरेंचे बलिदान

Khozmaster
4 Min Read

देऊळगाव राजा 🙁 दत्ता हांडे )

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या नावाने चार पानांचे मृत्यूपत्र लिहून शिवणी आरमाळचे रहिवासी, राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. होळीच्या सणाला १३ डिसेंबरला सकाळी शेतात त्यांचा मृतदेह आढळला. एकट्यासाठी नव्हेतर पंचक्रोशीतील सर्वांकरिता त्यांनी पाणी मागितले. चांगले पीक घेऊन शेतकरी समृद्ध व्हावेत, म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून आमच्या भागातील धरणे, तलावात सिंचनाकरिता पाणी वळविण्याची मागणी करत ते सरकारशी लढत राहिले. ही लढाई लढताना अनेक संकटांशी सामना केला. पण, पदरी अपयशच आले. आता आपली आहुती दिल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, याचा पक्का निश्चय केला आणि कैलास नागरे हुतात्मा झाले.  शेतकऱ्यांना पाणी द्या, असे सरकारला ओरडून सांगणाऱ्या नागरेंना विषाचा घोट घ्यावा लागला, शासन, प्रशासनाला ही आत्महत्या वाटेल, पण नागरेंचे हे आमच्यासाठी बलिदान आहे, त्यांनी हौतात्म्यच पत्करले आहे, त्यांचा त्याग आम्ही कदापि विसणार नाही, अशा भावनिक प्रतिक्रिया आज नागरेंच्या आत्महत्येनंतर उमटल्या. सिंचनाच्या सोयी उपलब्ध असतानाही केवळ शासन व प्रशासनाच्या अनास्थेने आजही शेतकरी मरणासन्न जीवन जगत आहेत. त्याचेच द्योतक कैलास नागरे यांनी आपल्या बलिदानातून दर्शविले. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवणी आरमाळ येथील कैलास अर्जुनराव नागरे हे प्रयोगशिल शेतकरी होते. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शासनाने युवा शेतकरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गाळ्या मातीचा धनी म्हणून ते या भागात परिचित होते. सरकारच्या मात्र, उदासीन धोरणामुळेच त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. पंचक्रोशीतील शेतीला बारमाही पाणी मिळण्याकरिता त्यांनी शासन दरबारी लढा दिला, निवेदने दिली. आंदोलने केली. डिसेंबर महिन्यात ७ दिवस त्यांनी शिवणी आरमाळ प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात अन्नत्याग आंदोलन केले. शासन, प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी २०२५ रोजी ते  पुन्हा उपोषणाला बसणार होते. परंतु पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आमदार मनोज कार्यदे यांच्या माध्यमातून आश्वासन दिल्याने ते थांबले, यानंतरच्या काळात शिवणी आरमाळ प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, खडकपूर्णाचे पाणी अंढेरा मंडळातील शिवणी आरमाळ प्रकल्पात सोडण्याची त्यांची मागणी धूळखात पडली होती. त्यावर निर्णय झाला नाही. दहा वर्षांपूर्वी खडकपूर्णाच्या पाण्यासाठी  काढलेल्या मोर्चात सामील होऊन पाडळी शिंदे येथील नारायण वायाळ परत निघाले होते. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या घटनेचीही यावेळी आठवण झाली.

शासनाशी दिलेला लढा ठरला अपयशी :- परिसरातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी न्याय मिळावा, यासाठी आठ दिवस उपोषण केले. शासन, प्रशासनाने केवळ आश्वासन दिले. जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्र्यांच्या वारंवार भेटी घेतल्या. मात्र, आश्वासने केवळ पोकळ ठरली. कैलास नागरे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारसोबत दिलेला लढा अपयशी ठरल्याने ते हतबल झाले होते. शेती, मातीवर अनेक कविता लिहिल्या. शेतकऱ्यांसाठी स्वागतगीत लिहिले. मात्र ते प्रकाशित करता आले नाही, असे नागरे यांनी म्हटले.

मुलांचे पालकत्व स्वीकारा :- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदारांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे, अशी भावनिक सादही कैलास नागरे यांनी घातली आहे. तसेच आमच्या शेतीचा वादही मिटवा, अशी विनंती केली आहे.
पत्नी, मुलांचा आक्रोश; पार्थिव न उचलण्याचा पवित्रा :- त्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील शेतकरी, गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी, मुलांसह नातेवाइकांनी एकाच आक्रोश केला, त्यांच्याजवळील चिठ्ठीतील मजकूर पाहून सर्वांचे मन उद्विग्न झाले. नागरे यांनी केलेली मागणी शासनस्तरावरून मान्य होत नाही, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कैलास नागरेंच्या मृतदेहाची कोणतीही उत्तरक्रिया करू देणार नाही, असा पवित्रा अनिल सोनपसारे, भगवान नागरे, शिवानंद शिंगणे, भगवान कायंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतला, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, उपविभाग पोलीस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार रुपेश शक्करगे, मंडळ अधिकारी प्रल्हाद केवार, तलाठी अनाळकर यांनी गावकऱ्यांची समजूत काढली. मात्र ते मानायला तयार नव्हते. अखेर माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंढे यांनी ही बाव आमदार मनोज कायंदे यांना सांतिगतले. आ. कार्यदे यांनी शासन दरबारी प्रश्न लावून धरून पाणी मिळवून घेऊ, असा शब्द दिला. त्यानंतर नागरेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 9 5 1 1 6
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *